भाजपच्या पिंपरी-चिंचवड जिल्हा शाखेत सुरू असलेल्या तीव्र गटबाजीच्या राजकारणातून पक्षाचा वर्धापनदिनही सुटू शकला नाही.  माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी व ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यातील गटबाजीचे लोण पिंपरीतही असल्याने गेल्या काही महिन्यात पक्षातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात मुंडे समर्थक गटाने वर्धापनदिनाच्या कार्यक्रमावर पूर्णपणे बहिष्कार टाकल्याने भरच पडली आहे.
भाजपच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी शहर भाजपने काही कार्यक्रमांचे आयोजन केले होते. चिंचवड येथे नगरसेवक शीतल िशदे यांच्या पुढाकाने ७०० किलो धान्य रहाटणी येथील वनवासी कल्याण आश्रम या संस्थेमार्फत दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात आले. तसेच, वाहन प्रदूषण चाचणी शिबीरात ५०० वाहनांची तपासणी करण्यात आली. पिंपरी डीलक्स चौकात मिठाईचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमांना शहराध्यक्ष एकनाथ पवार, सरचिटणीस प्रमोद निसळ, सचीन पटवर्धन, नामदेव ढाके आदी पदाधिकारी उपस्थित होते. पवार यांचे समर्थकच दोन्ही ठिकाणी प्रामुख्याने दिसून आले. तथापि, मुंडे समर्थकांनी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.