सदनिका भाडेतत्वावर घेऊन एकत्र राहणाऱ्या सलूनमधील कारागीराने सहकारी मित्राचा स्वयंपाकघरातील सुरीने भोसकून खून केल्याची घटना बाणेर भागात घडली. भांडी घासण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून मित्राचा खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अमर बसंत महापात्रा (वय २८, सध्या रा. प्रथम ब्लिस सोसायटी, बाणेर, मूळ रा. ओदिशा) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अनिलकुमार सरतकुमार दास (वय २१) याला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. बिरजू भुवनेश्वर साहू (वय ४०) याने याबाबत फिर्याद दिली आहे. महापात्रा, दास आणि साहू एका सलूनमधील कारागीर आहेत. बाणेरमधील प्रथम ब्लीस सोसायटीत ते सध्या राहत आहेत. तिघे जण कामावरुन घरी गेल्यानंतर स्वयंपाक करतात. शुक्रवारी रात्री तिघे जण घरी परतले. सकाळची राहिलेली भांडी घासण्यास महापात्राने दासला सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला.

यानंतर स्वयंपाक घरातील भाजी कापण्याच्या सुरीने दास याने महापात्रावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या महापात्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दास याला ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळगावे तपास करत आहेत.