अमृतमहोत्सवी वर्षांत पं. केशव गिंडे यांची भावना
वयाच्या सहाव्या वर्षी आईने हातामध्ये दिलेली बासरी हीच जीवनामध्ये माझ्यासाठी सर्वस्व झाली. अमृतस्वरांची बरसात करणाऱ्या बासरीने जीवन परिपूर्ण केले. बासरीवादनातून मला मिळालेली आत्मशांती रसिकांपर्यंत पोहोचवून त्यांना हा आनंद देण्यातच माझे सुख सामावले आहे, अशी भावना ज्येष्ठ बासरीवादक आणि ‘केशव वेणू’चे निर्माते पं. केशव गिंडे यांनी शनिवारी व्यक्त केली.
‘अमूल्यज्योती’ संस्थेतर्फे ज्येष्ठ बासरीवादक पं. पन्नालाल घोष यांचा स्मृतिदिन आणि पं. केशव गिंडे डे यांचा अमृतमहोत्सव असे दुहेरी औचित्य साधून रविवारी (४ डिसेंबर) संगीत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या सोहळ्यात पं. केशव गिंडे डे यांचे शिष्य दीपक भानुसे आणि प्रसिद्ध बासरीवादक पं. रोणू मुजूमदार यांचे बासरीवादन आणि पं. विजय कोपरकर यांचे गायन होणार आहे. ज्येष्ठ गायक पं. नाथ नेरळकर, ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ आणि राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांच्या उपस्थितीत ‘वेणूतपस्वी’ या शशिकांत चिंचोरे यांनी संपादित केलेल्या गौरव विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे.
‘‘माझे वडील वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे घरात संगीतमय वातावरण होते. माझी चुलत भावंडे व्हायोलिन, सतार, पखवाज, सारंगी, दिलरुबा ही वाद्ये वाजवीत असत. मीही ती वाद्ये हाताळण्याचा प्रयत्न केला. पण, लहान असल्यामुळे मला कुणी हात लावू द्यायचे नाही. त्यामुळे सगळ्यांत स्वस्त आणि मस्त असे बासरी हे वाद्य आईने माझ्या हाती दिले. हे वाद्य आजपर्यंत माझी सोबत करीत आले आहे,’’ असे सांगून पं. िगडे म्हणाले,की शाळेत दर शनिवारी निघणाऱ्या प्रभात फेरीची सांगता माझ्या बासरीवादनाने होत असे. मा. दीनानाथ यांना नाटय़संगीतामध्ये ऑर्गनची साथ करणारे नारायणराव बोरकर हे गांधर्व महाविद्यालयातील शिक्षक मला बासरी शिकवीत असत. मॅट्रिक झाल्यावर मी पुण्याला शिक्षणासाठी फग्र्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, भारतरत्न महर्षी कर्वे, यशवंतराव चव्हाण, चिंतामणराव देशमुख आणि प्राचार्य स. वा. कोगेकर यांच्या उपस्थितीत माझे बासरीवादन झाले होते. पं. पन्नालाल घोष यांचे बासरीवादन मी १९५२ मध्ये ऐकले होते. त्यानंतर त्यांचे सहकारी हरिपद चौधरी यांच्याकडे चार वर्षे बासरीवादन शिकलो. त्यानंतर त्यांनीच मला पन्नाबाबूंचे शिष्य पं. देवेंद्र मुर्डेश्वर यांच्याकडे शिक्षणासाठी पाठविले. बासरीवादनाबरोबरच बासरी बनविण्याचा छंद मला जडला. प्रारंभी १२ फूट लांबीची ‘अनाहत’ वेणू बनविली होती.’’
अशी घडली केशव वेणू
वेगवेगळे बासरीवादक वेगवेगळ्या सुरांसाठी विविध बासऱ्या वापरतात. एक बासरी खाली ठेवून दुसऱ्या बासरीने वादन करेपर्यंत १५ सेकंदाचा वेळ जातो. त्यामध्ये वादनाची शंृखला तुटण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेगळ्या प्रकारची बासरी बनविण्याचा विचार १९७० पासून माझ्या मनात होता. त्यानुसार एरवीच्या सात छिद्रांबरोबरच मी एक अतिरिक्त छिद्र केले. तीच केशव वेणू. या एकाच बासरीतून साडेतीन सप्तके सहजगत्या वाजविता येतात, असे पं. केशव गिंडे यांनी सांगितले.