शायरा बानो यांचे आवाहन
तीन तलाकच्या अमानुष रुढीतून सुटका व्हायला हवी असेल तर मुस्लीम समाजातील महिलांनी एकत्र यावे, असे आवाहन तीन तलाकविरोधी लढा उभारणाऱ्या शायरा बानो यांनी सोमवारी केले.
मुस्लीम सत्यशोधक मंडळातर्फे आयोजित वार्तालापामध्ये त्या बोलत होत्या. शायरा बानो यांचे बंधू अर्शद अली, शकील अहमद आणि मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी या वेळी उपस्थित होते.
पतीने तीन तलाक दिला. त्याविरोधात लढा देण्यासाठी दोघे भाऊ आणि वडील खंबीरपणे पाठिशी उभे राहिले, पण त्यासाठी त्यांना मुस्लीम समाजानेच त्रास दिला, असे शायरा बानो यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, तीन तलाकविरुद्ध न्यायालयाची पायरी चढताना या लढय़ाला एवढे मोठे स्वरूप प्राप्त होईल अशी अपेक्षा नव्हती. अॅड. बालाजी श्रीनिवासन यांनी एक रुपयाचे मानधन न घेताही माझा खटला चालविला. मुस्लीम महिलांचे अपार शोषण अनेक दशकांपासून होत आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी कायदा हा एकमेव उपाय आहे. हा कायदा आणण्यात कोणतेही राजकारण होऊ नये.
पतीने शायरा यांचा अनेक वेळा गर्भपात केला. तलाक देऊन दुसरे लग्न केले आणि मुलांचा ताबाही स्वत:कडे घेतला. धर्मातील कायदे काय सांगतात याचा विचार न करता आम्ही बहिणीबरोबर हा लढा दिला. त्यावरून ‘तुम्हाला बहिष्कृत केले जाईल’ अशा धमक्याही देण्यात आल्या. पण आपल्या बहिणीला नाही तर किमान पुढच्या पिढीला या लढय़ाचा उपयोग होईल या अपेक्षेने आपण खंबीर राहिल्याचे शायरा बानो यांच्या बंधूंनी सांगितले.
तांबोळी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाकविरुद्ध दिलेला निवाडा अनेक मुस्लीम महिलांसाठी दिलासादायक आहे. शहाबानो यांच्यापासून सुरू झालेला हा लढा राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी मुस्लीम सत्यशोधक मंडळ प्रयत्नशील आहे.