शिक्षणसंस्थांना स्वायत्तता देण्याचे नियम विद्यापीठ अनुदान आयोगाने शिथिल केले असून शिक्षणसंस्थांना दिलासा दिला आहे. यापुढे स्वायत्तता मिळवण्यासाठी महाविद्यालयांना राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणीकरण परिषद म्हणजेच ‘नॅक’कडून प्रत्यक्ष तपासणी करून घेण्याची आवश्यकता राहणार नाही.
महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यापूर्वी महाविद्यालयाचे ‘नॅक’ कडून प्रमाणीकरण करून घेणे यापूर्वी बंधनकारक करण्यात आले होते. मात्र स्वायत्ततेसाठी अर्ज केल्यानंतर नॅककडून पाहणी होणे, त्याचा अहवाल सादर होणे या प्रक्रियेत वेळ जात होता. या पाश्र्वभूमीवर आता आयोगाने त्यांच्या मार्गदर्शक सूचीमध्ये बदल केले आहेत. आता स्वायत्ततेपूर्वी नॅककडून प्रत्यक्ष पाहणीची आवश्यकता राहणार नाही. ज्या महाविद्यालयांना नॅककडून सलग दोन वेळा ‘अ’ दर्जा मिळाला आहे आणि तिसऱ्यावेळी ‘अ’ दर्जा मिळू शकेल याची खातरजमा मूल्यमापनाच्या काही फे ऱ्यांमध्ये झाली आहे, अशी महाविद्यालये स्वायत्ततेसाठी पात्र ठरणार आहेत.