मोठी स्वप्नं घेऊन तो तरुण पुण्यातून नोकरीसाठी दुबईला गेला. मात्र, त्याचा काही कारणाने घरातच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आणण्यासाठी आई, वडील, भाऊ तिथे पोहोचले, पण त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट व्हायचे असल्याने पोलिसांनी मृत्यूचा दाखला दिले नाही.. तीन आठवडे उलटूनही त्याचा मृतदेह भारतात आणणे शक्य झाले नाही, कशीबशी परवानगी घेऊन तिथेच अंत्यस्कार उरकण्यात आले. एवढे होऊनही त्याची ‘सुटका’ झाली नाही. मृत्यूचे प्रमाणपत्र न मिळाल्याने त्याच्या अस्थिसुद्धा आणता येत नव्हत्या.. त्यामुळे नातेवाईकही तिकडेच आहेत, प्रमाणपत्र लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करावा म्हणून भारतीय दूतावासाकडे दररोज पाठपुरावा करत आहेत.
श्यामकुमार शशीधरण नायर (वय २६, रा, आकुर्डी, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो १५ मे २०१३ रोजी पुण्यातून दुबईला नोकरीसाठी गेला होता. दुबईतील मुरक्काबाद या ठिकाणी एका मोठय़ा बँकेच्या वितरण विभागात नोकरी करत होता. तिथे तो पाच मित्रांसोबत एका घरात राहायचा. त्याच्यासोबत राहणारे मित्र पश्चिम बंगालमधील आहेत. श्यामकुमार हा ७ जून रोजी बाथरूममध्ये कोसळल्याचा मित्रांना आवाज आला. मित्रांनी बाथरूमचा दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुबई पोलिसांनी घटनेचा तपास करून शवविच्छेदन केले. त्याच बरोबर त्याच्या पाच मित्रांची चौकशी केली. पण, श्यामकुमारच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी त्याच्या रक्ताचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
श्यामकुमारचा मृतदेह आणण्यासाठी त्याची आई, वडील, भाऊ दुबईला गेले. पण, त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्याशिवाय दुबईतून मृतदेह भारतात आणण्यास पोलिसांनी परवानगी दिली नाही. तीन आठवडे थांबल्यानंतरही हे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे तेथील पोलिसांची परवानगी घेऊन कुटुंबीयांनी श्यामकुमारवर २७ जून रोजी अंत्यविधी केले. पण, त्याच्या अस्थी आणण्यासाठीसुद्धा मृत्यूचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते न मिळाल्याने त्या आणण्यासही परवानगी मिळालेली नाही. ‘आम्ही भारतीय दूतावास आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्ही कधीच अशी परिस्थती पाहिली नव्हती. भारतीय दूतावासाने मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवून देण्यास आम्हाला मदत करावी,’ अशी मागणी श्यामकुमारचा भाऊ शरथकुमार याने केली आहे. २०११ मध्ये श्यामकुमार दुबईला गेला होता. पण, आठ महिन्यांनी तो परत आला होता. त्यानंतर पुन्हा मे महिन्यात तो तिकडे गेला होता, असेही त्याने सांगितले.