‘शिवाजीराजे होऊन गेले गाजविली तलवार, स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार’..

पुणे : ‘शिवाजीराजे होऊन गेले गाजविली तलवार, स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार’.. खडय़ा आवाजातील हे गीत वीरपत्नी सुनीता चव्हाण यांनी सादर केले आणि वीरपत्नीच्या गायनाला प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी टाळ्या वाजवून ताल धरला. ‘हे खरे आमचे हिरो, आम्ही तर केवळ कचकडय़ाचे आहोत’, अशी टिप्पणी करीत नाना पाटेकर यांनी वीरपत्नीला अभिवादन केले.

भारत-पाकिस्तान युद्धातील विजयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त ‘स्वर्णीम विजय ज्योती’चे राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेमध्ये (एफटीआयआय) स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात ‘प्रहार’ चित्रपटाच्या निमित्ताने लष्करी प्रशिक्षण घेतलेले नाना पाटेकर यांच्यासह वीरपत्नी सुनीता चव्हाण, विंग कमांडर (निवृत्त) सुरेश कर्णिक, कमोडोर रवींद्रकुमार नारद, मेजर (निवृत्त) उदय साठे, ब्रिगेडिअर (निवृत्त) अजित आपटे यांचा सत्कार करण्यात आला. मेजर जनरल संदीप भार्गव आणि एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला या वेळी उपस्थित होते.

वीरपत्नीची आपुलकीने चौकशी करीत नाना पाटेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ‘मला गाणं म्हणायचं आहे’, अशी इच्छा प्रदर्शित करताच पाटेकर यांनी त्यांना सन्मानाने व्यासपीठावर बोलावून घेतले. त्यांनी गाणं सुरू करताच टाळ्या वाजवीत ताल धरला. नानांचे अनुकरण करीत सभागृहातील सर्वानी या गाण्याला टाळ्यांची साथ दिली. सैनिकाची बायको शोभते, अशा शब्दांत पाटेकर यांनी वीरपत्नीची प्रशंसा केली.

पाटेकर म्हणाले, प्रहार चित्रपटाच्या निमित्ताने तीन वर्षे मराठा लाईट इन्फ्रंट्रीमध्ये तीन वर्षे होतो. वयाच्या चाळीसाव्या वर्षी कमांडो प्रशिक्षण घेतले. कारगिल युद्धाच्या वेळी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांच्यासमवेत कुपवाडा येथे साठ दिवस होतो. आपण जीवन समर्पित करता म्हणून आम्ही सुखाने राहू शकतो. मात्र, तुमच्यामुळे आम्ही आहोत हेच आम्ही अनेकदा विसरून जातो. केवळ भारतमाता की जय म्हणून आमची जबाबदारी संपत नाही. सामान्य नागरिक म्हणून शहीद जवानांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही स्वीकारली पाहिजे. नाम संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे करत आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.