परमेश्वराला आपण सगुण-निर्गुण रूपात पाहण्याचा प्रयत्न करतो. हे ध्यानात घेतले तर, सगुण-निर्गुण भक्तिगीतांचा समावेश असलेला सीडींचा संच हा भक्तिरचनांचा अद्वितीय नंदादीप आहे, असे चैतन्य महाराज देगलूरकर यांनी सांगितले.
ओरायन स्टुडिओनिर्मित डॉ. सदाशिव जावडेकर रचित ३२ भक्तिरचनांचा समावेश असलेल्या ‘नंदादीप’ या चार सीडींच्या संचाचे प्रकाशन आळंदी येथील श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त डॉ. प्रशांत सुरू आणि चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. पं. संजीव अभ्यंकर, शौनक अभिषेकी, आरती अंकलीकर-टिकेकर आणि आनंद भाटे या प्रसिद्ध गायकांचा स्वर या भक्तिरचनांना लाभला असून आशिष केसकर यांची स्वररचना आहे. या कार्यक्रमास पं. श्रीनिवास केसकर, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, अभिनेते राहुल सोलापूरकर, फाउंटन म्युझिक कंपनीचे महेंद्र ओसवाल उपस्थित होते.
देगलूरकर म्हणाले, डॉ. जावडेकर यांनी अनुभूतीयुक्त समर्पक शब्दांद्वारे नियंत्याचे सगुण-निर्गुण रूप साकारण्याचा प्रयत्न केला आहे. आशिष केसकर यांच्या संगीताद्वारे प्रथितयश गायकांनी उत्तम सादर करून अद्वितीय अशी निर्मिती केली आहे.
डॉ. प्रशांत सुरू म्हणाले, भक्तीची अनुभूती या रचनांतील शब्दांमध्ये तंतोतंत साकारली आहे. केसकरांच्या घराण्यातील शास्त्रीय संगीताच्या परंपरेचा निर्मळ स्पर्श या निर्मितीला झाल्यामुळे आणि सुमधूर स्वरांची साथ लाभल्यामुळे एक परिपूर्ण निर्मिती साकार झाली आहे.
प्रकाशन कार्यक्रमानंतर आनंद भाटे, संजीव अभ्यंकर आणि शौनक अभिषेकी यांनी काही रचना सादर केल्या. बालकलाकार अद्वैत केसकर यानेही एकतारीवर भक्तिरचना सादर केली. आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या एका रचनेवर शिल्पा दातार यांनी कथक नृत्य साकारले. मििलद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2013 रोजी प्रकाशित
भक्तिरचनांचा अद्वितीय नंदादीप
‘नंदादीप’ या चार सीडींच्या संचाचे प्रकाशन आळंदी येथील श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त डॉ. प्रशांत सुरू आणि चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या हस्ते नुकतेच झाले.

First published on: 07-07-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nandadeep published by dr suru and deglurkar