कर्करोगाच्या जलद आणि अचूक निदानासाठी नॅनोरोबोटचे संशोधन

याद्वारे कर्करोगाचे जलद आणि अचूक निदान करणे शक्य होऊ शकणार आहे

शरीरातील गाठींतील (ट्यूमर) पेशी टिपून त्यांचे विलगीकरण करू शकणाऱ्या नॅनोरोबोटची निर्मिती तळेगाव-दाभाडे येथील मायमर वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली आहे. याद्वारे कर्करोगाचे जलद आणि अचूक निदान करणे शक्य होऊ शकणार आहे. मायमर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. शाश्वत बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाविद्यालयाच्या केंद्रीय संशोधन प्रयोगशाळेत हा नॅनो रोबोट तयार केला आहे. प्रगत संशोधनासाठी केंद्र सरकारकडून महाविद्यालयाला एक कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या संशोधनाचे निष्कर्ष नुकतेच कम्युनिकेशन्स केमिस्ट्री या संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाले आहेत.  संशोधनाची बॅनर्जी यांनी माहिती दिली. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या अहवालानुसार, भारतात कर्करोगाचे दरवर्षी सुमारे दहा लाखांहून अधिक रुग्ण आढळतात. तसेच आयसीएमआर आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रीसर्चच्या अहवालानुसार २०२५ पर्यंत देशातील कर्करोगाच्या रुग्णांची संख्या १५ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्करोगाचा प्रतिबंध आणि उपचार हे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोरील आव्हान आहे. कर्करोगाच्या आजाराच्या निदानासाठी सध्या बायोप्सी, त्यानंतर अनुवांशिक आणि जनुकीय विश्लेषण केले जाते. मात्र संक्रमणातील प्रगत टप्पा गाठलेल्या कर्करोगाचे विश्लेषण प्राथमिक रुग्णालयात सहज शक्य होत नसल्याने आता कर्करोगाच्या आजाराची स्थिती निश्चित करून उपचार पद्धती निवडण्यासाठी नवीन प्रणाली विकसित करण्यावर जगभरातील शास्त्रज्ञांचा भर आहे. त्याच वेळी (रिअल टाइम) अचूक निदान होणे भविष्यात टिश्यू बायोप्सीची जागा घेऊ शकते असे लिक्विड बायोप्सीचे बरेच फायदे आहेत. लिक्विड बायोप्सीमध्ये सध्या प्रचलित ट्यूमर पेशी नॉन-इनवेसिव्ह प्रक्रियेद्वारे विलग करण्याच्या पद्धतीचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nanorobot research for quick and accurate diagnosis of cancer abn