पुणे : सर्व समाज व्यवहारांच्या मुळाशी धर्म असल्याने समाजात सुधारणा करावयाची असल्यास धर्मात सुधारणा करावी लागेल, या संत आणि समाज सुधारकांच्या विचारांशी बांधीलकी जोपासत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ पुढे नेली. धर्माचा संकुचित विचार करणाऱ्या, त्यामध्ये हितसंबंध दडलेल्या लोकांना डॉ. दाभोलकर धर्माचे शत्रू वाटत असले तरी प्रत्यक्षात ते धर्माचे मित्रच होते, असे मत साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त ‘महाराष्ट्रातील संत समाजसुधारकांची परंपरा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ’ या विषयावर मोरे यांचे व्याख्यान झाले.   डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित ‘विवेकाचा आवाज’ या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देव मानणारी संत मंडळी विज्ञाननिष्ठ नव्हती, ती प्रतिगामी होती, असे म्हणत पाश्चिमात्य विचार आत्मसात करणे म्हणजे पुरोगामित्व ही अत्यंत बाळबोध आणि चुकीची संकल्पना आहे, असे ठणकावून सांगत डॉ. मोरे यांनी संत आणि समाजसुधारकांचे योगदान सांगितले. ते म्हणाले, धर्म ही मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. संत आणि समाजसुधारकांनी धर्माच्या चौकटीत राहून समाज सुधारण्यासाठी संघर्ष केला. या परंपरेचा विस्तार काळानुरूप करणे आवश्यक आहे. डॉ. दाभोलकर हे देव-धर्माच्या विरोधात कधीच नव्हते. ते शोषणाच्या विरोधात होते, असे सयाजी शिंदे यांनी सांगितले. डॉ. दाभोलकर यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार आपुलकी व आस्थेने सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली.