* नरेंद्र मोदी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी विविध कार्यक्रमांसाठी रविवारी (१४ जुलै) पुण्यात दाखल झाले. दुपारी बाराच्या सुमारास फर्ग्युसन महाविद्यालयातील अॅम्फी थिएटरच्या नूतनीकरणाच्या उद्घाटन कार्य़क्रमात मोदींनी आपल्या भाषणात भारतातील युवांना महत्व देत भारत तरूणांचा देश आहे, फक्त योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच देश घडविण्यासाठी युवाशक्ती महत्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या शिक्षण संस्था फक्त पैसे उकलण्याचे काम करत आहेत. योग्य शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्यामुळे देशाचे नाक कापले गेले. खेळाला शिक्षणाची जोड देण्याची गरज आहे. असेही मोदी म्हणाले
चार वर्षांनंतर त्यांची जाहीर सभा पुण्यात होत असून काँग्रेसमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त भारत असा निर्धार सभेत केला जाणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहात स्वा. सावरकर यांचे वास्तव्य ज्या खोलीत होते त्या वास्तूलाही मोदी भेट देणार आहेत.
अॅम्फी थिएटरच्या शताब्दी वर्षांचे औचित्य साधून हे नूतनीकरण करण्यात आले आहे. नव्या व्यासपीठाला बी. जी. शिर्के यांचे नाव देण्यात आले आहे. या निमित्ताने ‘शिक्षण आणि विकास’ या विषयावर मोदी विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार आहेत.
सभेची तयारी पूर्ण
जाहीर सभा बी. जे. मेडिकल कॉलेजच्या मैदानावर मोदी यांची जाहीर सभा दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. सभेसाठी बंदिस्त व अच्छादित स्वरूपाचा एक लाख २५ हजार चौरसफुटांचा मंडप उभारण्यात आला आहे. गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्यासह शिवसेना व आरपीआयचे नेते या वेळी उपस्थित असतील.
वाहतूक व्यवस्थेत बदल
शहरात सुरक्षिततेच्या दृष्टीने दुपारपासून रात्री आठ दरम्यान विविध मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. सर्किट हाउस, शिवाजीनगर, बी. जे. मेडिकल कॉलेज मैदान, साधू वासवानी मिशन आदी ठिकाणी मोदी यांचे कार्यक्रम होणार आहेत. ज्या वेळी ते ज्या मार्गावरून जातील ते रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
मोदी यांच्या उपस्थितीतील कार्यक्रम
दुपारी बारा – नूतनीकरण केलेल्या अॅम्फी थिएटरचे उद्घाटन
दुपारी साडेबारा – विद्यार्थ्यांशी संवाद, फर्ग्युसन महाविद्यालय
दुपारी साडेतीन – भाजपतर्फे आयोजित जाहीर सभा
सायंकाळी सहा – साधू वासवानी मिशनच्या नर्सिग स्कूलचे उद्घाटन