मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नावीन्यपूर्ण संशोधनात आपण मागे आहोत. त्यामुळे त्याला सर्व पातळ्यांवर प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शोध हीच भारताची ताकद असून, नावीन्यपूर्ण संशोधनाला पूरक वातावरण तयार करण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी), टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’ या परिषदेचे उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, इंटरनॅशनल लॉंन्जिटिव्हिटी सेंटर, इंडिया’चे (आयएलसी इंडिया) अध्यक्ष जयंत उमराणीकर, कार्यकारी संचालिका अंजली राजे, ‘पीआयसी’ मानद संचालक प्रशांत गिरबने या वेळी उपस्थित होते.

डेंग्यू आजाराचे कमी खर्चात आणि केवळ १५ मिनिटांत निदान करणाऱ्या ‘डेंग्यू डे वन टेस्ट किट’ची निर्मिती करणारे डॉ. नवीन खन्ना यांना जावडेकर यांच्या हस्ते ‘अंजनी माशेलकर इन्क्ल्यूजिव्ह इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. या परिषदेसाठी निवड झालेल्या आठ राज्यांमधील १८ संशोधकांना जावडेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

जावडेकर म्हणाले,की शिक्षण हेच विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. नावीन्यपूर्ण संशोधनाच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसून तीच खरी संशोधनाची ताकद आहे. डॉ. खन्ना यांचे संशोधन हे ‘मेक इन इंडिया’चे उत्तम उदाहरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना केवळ भारतात उत्पादन करण्यापुरती मर्यादित नाही, तर भारतातच संशोधन करून त्यात गुंतवणूक होऊन तयार उत्पादन अभिमानाने विक्रीस यावे, हे त्यामध्ये अभिप्रेत आहे.

आपल्या संशोधनाचा फायदा थेट लोकांपर्यंत पोहोचला का, याचा विचार व्हायला हवा, असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.

डेंग्यू डे वन टेस्ट किट

डॉ. नवीन खन्ना म्हणाले, ‘डेंग्यू डे वन टेस्ट किट’ हे डेंग्यू तापाच्या संसर्गाचे निदान पहिल्या दिवसापासून करते. याबरोबरच डेंग्यूचा ताप प्राथमिक स्वरूपाचा आहे की ‘सेकंडरी’ हेदेखील या चाचणीतून कळते. रुग्णाच्या वैद्यकीय उपचारांसाठी या माहितीचा खूप उपयोग होतो. माणसांबरोबर डासांमध्ये डेंग्यू तापाचा संसर्ग आहे का, हेही या किटद्वारे कळू शकते. भारतात या किटची उत्तम विक्री होत असून आता ते इतर देशांमध्येही विक्रीस पाठविले जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National conference on social innovation inaugurated by prakash javadekar
First published on: 18-11-2017 at 04:21 IST