मुलांकडे लक्ष कसे द्यायचे, त्यांना वेळ कसा द्यायचा. या नोकरदार पालकांना पडणाऱ्या प्रश्नांवर यंत्रमानवाच्याच्या माध्यमातून उत्तर मिळाले तर. हे उत्तर देशातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांचे संघ शोधणार आहेत. पुण्यात बालेवाडी येथे गुरूवारपासून राष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेची सुरूवात होत असून ‘पालकत्वाला अभिवादन’ या संकल्पनेवर यावर्षी स्पर्धा होणार आहे.
‘एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन’ आणि दूरदर्शन तर्फे राष्ट्रीय स्तरावरील रोबोकॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेचे यजमानपद यावर्षी ‘एमआयटी अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग’ कडे असून गुरूवार ते शनिवार (६ ते ८ मार्च) बालेवाडी क्रीडासंकुलात ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे मुख्य निमंत्रक डॉ. सुनील कराड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, दूरदर्शनचे पश्चिम क्षेत्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, एमआयटी अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य आणि स्पर्धेचे समन्वयक डॉ. योगेश भालेराव उपस्थित होते.
‘पालकत्वाला अभिवादन’ अशी या स्पर्धेची संकल्पना आहे. पालकत्वाची जबाबदारी सांभाळताना येणाऱ्या अडचणींवर यंत्रमानवाच्या माध्यमातून उत्तर शोधण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. या स्पर्धेमध्ये देशभरातील ९० संघ आपला आविष्कार साकारणार आहेत. यावर्षी आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धाही पुण्यातच होणार असून ऑगस्ट महिन्यामध्ये ही स्पर्धा होणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अव्वल ठरलेले दोन संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.