चतु:शृंगी मंदिर परिसरात यात्रेसाठी यंदाही रेडिओ स्टेशन!

देवस्थानची नवरात्रोत्सवासाठी तयारी पूर्ण झाली असून यंदा देवीसाठी हिऱ्याची नथ हा नवा अलंकार करण्यात आला आहे. तर, तीन एकर मंदिर परिसरात नवरात्रोत्सवासाठी रेडिओ स्टेशन कार्यरत राहणार आहे.

चतु:श्रुंगी देवीचे १० ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणे भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. देवस्थानची नवरात्रोत्सवासाठी तयारी पूर्ण झाली असून यंदा देवीसाठी हिऱ्याची नथ हा नवा अलंकार करण्यात आला आहे. तर, तीन एकर मंदिर परिसरात नवरात्रोत्सवासाठी रेडिओ स्टेशन कार्यरत राहणार आहे.
गुरुवारी (२५ सप्टेंबर) अश्विन शुद्ध प्रतिपदेस यंदाचे सालकरी सुहास अनगळ यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना होणार आहे. दररोज सकाळी १० आणि रात्री ९ वाजता देवीची आरती होणार आहे. तिथीचा क्षय झाल्यामुळे या वर्षी खंडेनवमी आणि विजया दशमी एकत्र आली आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर रोजी सकाळी नवचंडी होम होणार आहे. तर, ढोल-ताशा, वाघ्या-मुरळी, बत्तीवाले, सेवेकरी, बँडपथक यांचा समावेश असलेली देवीची सीमोल्लंघनाची मिरवणूक सायंकाळी ५ वाजता निघणार आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सुभाष अनगळ आणि कार्यकारी विश्वस्त नंदकुमार अनगळ यांनी सोमवारी दिली. मुंबईतील एका भाविकाने देवीला हिऱ्याची नथ देण्याचे ठरविले आहे. ही नथ घडविण्याचे काम सुरू असून दसऱ्यापर्यंत ही नथ देवीला अर्पण करण्याचा त्यांचा मानस असल्याचेही अनगळ यांनी सांगितले.
‘ग्रीन हिल’ संस्थेच्या सहकार्याने निर्माल्यापासून खतनिर्मिती हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी दोन हजार टन निर्माल्याचा वापर करण्यात आला होता. सौरऊर्जेच्या प्रकाशात मंदिर परिसर उजळून निघणार आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराच्या पायथ्याशी १६ सौरऊर्जा दिवे बसविले असून आणखी दोन टप्प्यांत वर्षभरामध्ये मंदिर उजळून निघेल. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली असून मंदिर परिसरातील स्वच्छतेसाठी बी. व्ही. ग्रुपचे सहकार्य लाभले आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांग असेल, असेही अनगळ यांनी सांगितले.

अनगळ म्हणाले, की गेल्या वर्षी सुरू केलेल्या रेडिओ स्टेशनला उत्तम प्रतिसाद लाभला. भाविकांसाठी सामाजिक उद्घोषणांबरोबरच भजन, कीर्तन आणि भक्तिसंगीताचे प्रसारण करण्यात आले. या रेडिओ स्टेशनमुळे गर्दीत चुकलेली मुले पालकांना सापडण्यासाठी पोलिसांना चांगली मदत झाली. मंदिर परिसरात २० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून दर्शनासाठी रांगेत असलेल्या भाविकांना एलईडी स्क्रीन आणि दोन क्लोजसर्किट टीव्हीद्वारे देवीचे दर्शन घडेल. उत्सवकाळात १०० पोलीस कर्मचारी, ५० होमगार्ड, अनिरुद्ध सेवा केंद्राचे स्वयंसेवक आणि मंदिराचे सुरक्षारक्षक दोन पाळ्यांमध्ये कार्यरत असतील. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्हीआयपी दर्शन पास १०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Navratri chaturshringi temple radio

ताज्या बातम्या