राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोसरी बालेकिल्ल्याला खिंडार पाडून राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदाराचा पराभव करून निवडून आलेल्या बंडखोर आमदार महेश लांडगे यांनी भाजपची वाट धरली. मात्र, राष्ट्रवादीकडून मिळालेल्या स्थायी समिती अध्यक्षपद तसेच नगरसेवकपदाचे काय, याबाबतचा निर्णय त्यांनी गुलदस्त्यात ठेवल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क आहेत.
भोसरीतून निवडून आल्यानंतर लांडगे यांनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, ते पिंपरी पालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक असून स्थायी समितीचे अध्यक्षही आहेत. तरीही निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीऐवजी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. राष्ट्रवादीवर नागरिकांची तीव्र नाराजी असल्याने त्यांना राष्ट्रवादीचे तिकीट नको होते. शिवसेनेच्या उमेदवारीसाठी त्यांनी विविध प्रकारे प्रयत्न करून पाहिले. मात्र तेथे डाळ न शिजल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. भाजप उमेदवार एकनाथ पवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली सभा, शिवसेनेच्या उमेदवार सुलभा उबाळे यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा, तर, लांडे यांच्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताकद लावली असतानाही प्रतिकूल परिस्थिती आणि चुरशीच्या लढतीत लांडगे यांनी विजयश्री खेचून आणली. त्यानंतर, त्यांना खेचण्यासाठी भाजप-शिवसेनेत  रस्सीखेच सुरू झाली. अजितदादांनी ‘झालं-गेलं’ विसरून जाऊ, अशी भूमिका घेतली. मात्र, भोसरी मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न केंद्र व  राज्यशासनाशी निगडित असल्याने ते सोडवून घेण्याच्या हेतूने त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, राष्ट्रवादीकडून मिळालेले नगरसेवकपद तसेच स्थायी समितीचे अध्यक्षपद आजही त्यांच्याकडेच आहे. बंडखोरी कायम ठेवताना ही पदे सोडणार असल्याचे लांडगे यांनी जाहीर केले होते. तर, कारवाईचा भाग म्हणून या दोन्ही पदांचे राजीनामे घेणार असल्याचे सूतोवाच अजितदादांनी केले होते. प्रत्यक्षात, कोणीही काहीही केले नाही. त्यामुळे ‘जैसे थे’ परिस्थिती आहे. एकीकडे लांडगे भाजपच्या कळपात जात असताना त्यांच्याकडील राष्ट्रवादीची पदे कायम आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर मंगळवारी स्थायी समितीची नियमित बैठक होत आहे. लांडगे त्यात सहभागी होणार का, भाजपकडे जात असताना राष्ट्रवादीचे ‘लाभ’ पदरात पाडून घेणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.