पुणे शहराचा कचरा प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याचे संकेत दिसत आहेत. पुणे महापालिकेच्यावतीने हडपसर येथील प्रस्तावित कचरा प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे आणि अशोक कांबळे यांनी महापौर मुक्ता टिळक यांना गुरुवारी कचरा भेट देत निषेध नोंदवला. हडपसमध्ये कोणत्याही परिस्थितीत कचरा प्रकल्प होता कामा नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
पुणे महापालिकेच्या वतीने हडपसर येथील रामटेकडी भागात ७५० मेट्रिक टनचा कचरा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पास भाजप वगळता इतर पक्षातील नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रश्नावर अनेक वेळा आंदोलन देखील करण्यात आले. यासंदर्भात आज योगेश ससाणे आणि अशोक कांबळे यांनी महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेतली.

शहरातील कचरा प्रश्नावर होणाऱ्या विरोधावर मुक्ता टिळक म्हणाल्या की, रामटेकडी येथील कचरा प्रकल्पास विरोध होत आहे. याप्रकरणी लोकप्रतिनीधींची विशेष बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. रामटेकडी येथे कचरा प्रकल्पासंदर्भात सकारात्मक विचार न केल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशारा ससाणे यांनी यावेळी दिला. हडपसरमधील नियोजित जागेला पर्यायी जागा शोधावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.