आपण सत्तेत होतो या मानसिकतेतून आता आपल्याला बाहेर पडावे लागेल. पराभव तर होतच असतात. त्याने नाउमेद होण्याचे कारण नाही. लोकांच्या प्रश्नांवर आता लढायला तयार व्हा. लढलात तर लोक डोक्यावर घेतील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शनिवारी पक्षाच्या नेत्यांकडून विश्वास देण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बालेवाडी येथे पक्षाचे दोन दिवसीय प्रतिनिधी संमेलन आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन शनिवारी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यावर आता भर द्यावा, असे आवाहन नेत्यांनी केले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पक्षाचे नेते अजित पवार, डी. पी. त्रिपाठी, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, वंदना चव्हाण, अंकुश काकडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. तटकरे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.
आदेशाची वाट पाहू नका – भुजबळ
भाजपकडून विकास आणि जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम केले जात असल्याची टीका भुजबळ यांनी केली. मनामनातील विषवल्ली वाढत गेली, तर या देशात शांतता कशी राहणार, असा प्रश्न उपस्थित करून देशात शांतता आणि एकोपा असला पाहिजे, असे ते म्हणाले. लोकांच्या प्रश्नांवर आता लढायला तयार व्हा आणि आंदोलनांसाठी पक्षाच्या आदेशाची वाट पाहत बसू नका, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
जनतेच्या हितात तडजोड नाही – त्रिपाठी
जनतेच्या हिताचे असतील अशा सर्व निर्णयांना, धोरणांना आमचा पाठिंबा राहील. मात्र जनतेच्या हिताविरोधात ज्या गोष्टी होतील त्याला आम्ही कडाडून विरोध करू. नागरिकांना बाधक ठरतील अशा कोणत्याही बाबीशी आम्ही तडजोड करणार नाही, असे त्रिपाठी यांनी सांगितले.
शेतकरीहिताचे निर्णय नाहीत – जयंत पाटील
शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक असताना या सरकारने शेतकरीहिताचे कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. निवडणुकीत अनेक घोषणा सरकारने केल्या होत्या. त्यातील कोणत्याही घोषणेची पूर्तता शंभर दिवसांनंतरही झालेली नाही, असे ते म्हणाले.
पक्ष भरारी घेईल – वळसे पाटील
पक्षाच्या ध्येयधोरणांशी सुसंगत कार्यक्रम कार्यकर्त्यांनी राबवल्यास पक्ष निश्चितपणे भरारी घेईल, असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला. आपण ग्रामीण भागाचे प्रश्न मांडतो. त्या बरोबरच शहरी भागाचे प्रश्न मांडले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
‘पवार यांना वाजपेयींनी केंद्रीय मंत्रिपद देऊ केले होते’
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये शरद पवार यांना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मंत्रिपद देऊ केले होते. मात्र पवार यांनी तो प्रस्ताव नाकारला, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी उद्घाटनपर भाषणात बोलताना केला. भाजपसोबत जायचे असते, तर तेव्हाच गेलो असतो, असेही ते म्हणाले. भाजप आणि राष्ट्रवादी जवळ येत असल्याची चर्चा गेले काही दिवस सातत्याने सुरू असल्याच्या पाश्र्वभूमीवर पटेल म्हणाले, की वाजपेयी यांनी स्वत: पवार यांना मंत्रिपद देऊ केले होते आणि राज्यातही भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी यांना एकत्र येता येईल, असे सांगितले होते. भाजपसोबत जायचे असते, तर तेव्हाच गेलो असतो. लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी देखील भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला, तरी कोणताही पदे आम्ही मागितली नाहीत. आम्ही विचारधारेशी कोणतीही तडजोड केलेली नाही.