scorecardresearch

थरारक! राष्ट्रवादीचे आमदार बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार; थोडक्यात बचावले

आरोपी तान्हाजी पवार याला अटक

youth fired on pimpari chinchwad ncp mla anna bansode
घटनेनंतर माहिती देताना आमदार बनसोडे.

‘गँगवॉर’मुळे चर्चेत असलेल्या पुण्यानंतर पिंपरी चिंचवडीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. तान्हाजी पवार असं गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचं कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तुलातून आमदार बनसोडे यांच्या दिशेनं गोळी झाडली. या गोळीबारात बनसोडे हे सुदैवाने बचावले असून, या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.

हा सर्व प्रकार दुपारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी आरोपी तान्हाजी पवार याला पिंपरी पोलिसांनी अटक केली असून, गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. ‘याप्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करतील’, असे आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

नेमकं काय घडलं? बनसोडेंनी सांगितला घटनाक्रम

या घटनेविषयी बोलताना आमदार बनसोडे म्हणाले,”अॅन्थनी म्हणून एक कंत्राटदार आहे. मी त्याला ओळखत नाही. तीन साडेतीन वर्षांपासून तो आमच्याकडे काम करतोय. त्याचा तान्हाजी पवार म्हणून एक सुपरवायझर आहे. त्याला माझ्या पीएने फोन केला होता. मागच्या दहा दिवसांपासून त्याला फोन करतोय. दोन मुलं कामाला घे इतकंच त्याला सांगितलं होतं. बोलतानाच त्याने अरेरावी केली. तेव्हढंच झालं. त्यानंतर तो आज सकाळी आला. माझ्यासोबत त्याचं बोलणं झालं. मी त्याला विषय सोडून द्यायला सांगितलं. त्याच्या मालकालाही मी याबद्दल बोललो. दरम्यान, तो कार्यालयाच्या बाहेर आला आणि त्याने गोळीबारच केला. येताना तो पूर्वनियोजन करुनच आला असावा, कारण त्याने सोबत त्याचा साथीदार, त्याचा मेहुणा होता. त्यांच्याकडेही पिस्तुल होतं,” असं आमदार बनसोडे म्हणाले.

“कोणतीही वादावादी झाली नाही. त्याने वाद घातला. मग माझ्या कार्यालयात काही कार्यकर्ते होते. त्यांनी ते बघितलं. त्यांनी त्याला शिवीगाळ केली. त्याने गोळीबार केल्यानंतर मुलांनी त्याला धक्का देऊन खाली पाडलं. नंतर त्याला मारहाण केली. तोपर्यंत त्याने दोन फैरी झाडल्या होत्या. पहिली गोळी माझ्या दिशेनं झाडली. पण, एका मुलाने धक्का मारल्याने ती दुसऱ्या दिशेला गेली. त्याला कुणी पाठवलं होतं, याचा तपास पोलीस करत आहेत. कचऱ्याचा कंत्राटदार जर पिस्तुल बाळगणारे सुपरवायझर ठेवत असेल, तर कसं व्हायचं,” असा सवालही बनसोडे यांनी उपस्थित केला आहे.

अण्णा बनसोडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असून, फडणवीस यांच्या दुसऱ्या कार्यकाळात जेव्हा अजित पवारांनी भाजपासोबत युती केली होती, तेव्हा आमदार अण्णा बनसोडे यांनीही त्यांना पाठिंबा दिलेला होता. अजित पवार यांचे ते विश्वासू आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-05-2021 at 16:45 IST