अजित पवार यांची घोषणा

शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत आहे, तर दुसरीकडे भाजप सरकार विरोधात नाराजी आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी उमेदवार देण्यात येणार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केली. लोकसभेच्या जागेबरोबरच खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठीही राष्ट्रवादीकडून उमेदवार देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.

शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी वारजे येथे हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पवार बोलत होते. भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका करताना अजित पवार यांनी पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याचे स्पष्ट केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती आणि पुण्याची जागा काँग्रेसने लढवली होती. त्या पाश्र्वभूमीवर पक्षाच्या सभेत पवार यांनी पुण्याची जागा लढवण्याची घोषणा केल्यामुळे त्यावर चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता धनंजय मुंढे, खासदार सुप्रिया सुळे, पक्षाच्या शहराध्यक्षा, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी या सभेत उपस्थित होते.

पुणे जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांचे काम चांगले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू झाली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी पुण्याच्या लोकसभेच्या जागेवर दावा करणार असून ही जागा लढविणार असल्याचे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, बारामती मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांचे काम चांगले आहे. त्यामुळे दुसरा कोणी उमेदवारी मागेल, अशी शक्यता नाही. विधानसभा आणि लोकसभेसाठी सर्वाना सारखाच नियम असेल. उमेदवारी मागणाऱ्याचा लेखाजोखा आणि त्याचे काम पाहिले जाईल. शहराच्या समस्या सोडविण्यात भारतीय जनता पक्षाला अपयश आले आहे. त्यामुळे सक्षम उमेदवारच दिला जाईल.

धनंजय मुंडे म्हणाले,  केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. मात्र नागरिकांच्या हिताचे निर्णय सरकारकडून घेण्यात आलेले नाहीत. सरकारच्या १६ मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. या घोटाळ्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या चिक्की घोटाळ्याचाही समावेश असून कॅगच्या अहवालातही दोन हजार कोटींचा तूरडाळ घोटाळा झाला यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे जनताच या भ्रष्टाचाराची दखल घेईल.

सूडबुद्धीचे राजकारण

भारतीय जनता पक्षावरही पवार यांनी जोरदार हल्ला चढविला. भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलात तर ठीक अन्यथा त्यांच्याकडून सूडबुद्धीने अडकविण्याचे काम सुरू होते. अहमदनगर येथील शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना सूडबुद्धीच्या राजकारणातूनच अडकविण्याचा प्रयत्न झाला आहे, असा आरोप पवार यांनी केला. संग्राम जगताप यांच्याप्रमाणेच छगन भुजबळ यांना देखील अडकवण्यात आले असून ते लवकरच बाहेर पडतील.