पवारांसमोरच पदाधिकाऱ्यांचा आरोप

पिंपरी: पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वात प्रबळ पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला वारंवार पराभवाला सामोरे लागते, त्यास पक्षांतर्गत गटबाजी, नात्यागोत्याचे राजकारण आणि अंतर्गत लाथाळ्याच कारणीभूत असल्याची भावना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

राष्ट्रवादी काँग्रेस माजी नगरसेवक संघटना तसेच पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका पवार यांच्या उपस्थितीत झाल्या. या वेळी पक्षात सुरू असलेल्या चुकीच्या गोष्टी, उणिवा, कमकुवत बाजू आदींची सविस्तर चर्चा झाली. गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत आझम पानसरे, राहुल नार्वेकर आणि पार्थ पवार या उमेदवारांचा पराभव पक्षांतर्गत कारणांमुळेच झाला, याकडे पवारांचे लक्ष वेधण्यात आले. आझम पानसरे यांच्यावेळी जातीय प्रचार झाला. नार्वेकरांच्या वेळी स्थानिक-बाहेरचा मुद्दा ऐरणीवर आणण्यात आला. तर, पार्थ पवारांच्या वेळी नात्यागोत्याचे राजकारण झाले. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात छुपा प्रचार करून त्यांना पाडण्यात आले. पालिका निवडणुकीत अशाच कारणांमुळे राष्ट्रवादीचा पराभव झाला आणि पालिका भाजपच्या ताब्यात गेली. आता पुन्हा पालिकाजिंकायची असल्यास गटबाजीचे आणि नात्यागोत्याचे राजकारण थांबवले पाहिजे, असा सूर बैठकीत होता.

जगदीश शेट्टी, तानाजी खाडे, शमीम पठाण, श्याम वाल्हेकर, रामआधार धारिया, महंमद पानसरे, शंकरराव पांढरकर, पंडित गवळी, विनायक रणसुभे, किरण मोटे आदींनी मनोगते व्यक्त करताना अनेक मुद्दे उपस्थित केले. सर्वाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पवार म्हणाले,की एकमेकांशी समन्वय साधून आणि सर्वाना बरोबर घेऊन काम करा. गेलेली सत्ता परत मिळवा. ज्येष्ठांनी नव्यांना सांभाळून घ्यावे आणि चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे.

पार्थ पवार, आझम पानसरे, राहुल नार्वेकर यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पक्षांतर्गत कारणांमुळेच झाला. पक्षविरोधी काम करणाऱ्यांना मानसन्मान मिळतो. निष्ठेने काम करणाऱ्यांची गळचेपी होते. गाववाला-बाहेरचा आणि नात्यागोत्याच्या राजकारणाचा राष्ट्रवादीला कायम फटका बसला आहे. सर्वात कमी वयाचा नगरसेवक म्हणून निवडून आलो असताना आणि चांगले काम करूनही माझे तिकीट कापण्यात आले होते.

– किरण मोटे, माजी नगरसेवक