प्रतिनिधी, पुणे

अवकाशातील अधिक सखोल संशोधनासाठी महत्त्वाची ठरणारी एसकेए ही जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण तयार करण्याच्या प्रकल्पात राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राने (एनसीआरए) महत्त्वाची भूमिका निभावली आहे. या प्रकल्पातील एसकेए टेलिस्कोप मॅनेजर ही दुर्बीण संचार आणि नियंत्रण प्रणाली भारताच्या नेतृत्वाखाली विकसित झाली आहे. ही प्रणाली इंग्लंडच्या एसकेए संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली असून, माणसाच्या शरीरातील मेंदू आणि मज्जासंस्थेप्रमाणेच रेडिओ दुर्बिणीत टेलिस्कोप मॅनेजर काम करणार आहे.

भारताच्या नेतृत्वाखाली अन्य देशांच्या सहकार्याने टेलिस्कोप मॅनेजर प्रणालीचे काम पूर्ण झाल्याची माहिती प्रकल्प प्रमुख प्रा. यशवंत गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. टेलिस्कोप मॅनेजर हा एसकेए दुर्बिणींच्या एकूण बारा आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी समूहांपैकी एक आहे. या सर्व समूहांमध्ये वीस देशांतील शास्त्रज्ञ आणि अभियंते काम करत आहेत. बारा समूहांपैकी नऊ समूह दुर्बिणीसाठी लागणाऱ्या घटकांवर काम करत असून, उर्वरित तीन समूह दुर्बिणीच्या अद्ययावत उपकरण प्रणालीसाठी कार्यरत आहेत. गेल्या साडेचार वर्षांपासून टेलिस्कोप मॅनेजर ही प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू होते. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी एप्रिल २०१८मध्ये घेतलेल्या चिकित्सक परीक्षण चाचणीत ही प्रणाली उत्तीर्ण झाली, असे गुप्ता यांनी सांगितले.

‘टेलिस्कोप मॅनेजर’ प्रणाली विकसित करण्यासाठी नोव्हेंबर २०१३ मध्ये स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय समूहामध्ये एनसीआरए, टीसीएस रिसर्च अँड इनोव्हेशन, पर्सिस्टंट या भारतातील संस्थांसह अनेक देशांतील संस्थांचा समावेश आहे.