पुणे : ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाइल अॅपमध्ये काही महत्त्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास सोपे आणि सुलभ मोबाइल अॅपची सुधारित आवृत्ती -२ विकसित करण्यात आली आहे. हे सुधारित अॅप सोमवारपासून (१ ऑगस्ट) शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सुधारित मोबाइल अॅपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यिबदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले असून, शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील त्यावेळी छायाचित्र घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यिबदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्या बाबतचा संदेश मोबाइल अॅपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकाचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.
हमीभावाच्या पिकांची नोंद..
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाइल अॅपद्वारे नोंदविलेली पीक पाहणी ४८ तासांमध्ये स्वत:हून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल. किमान आधारभूत योजनेअंतर्गत येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार असून, त्याआधारे पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. या पूर्वीच्या मोबाइल अॅपमध्ये असलेल्या मुख्य पीक व दोन दुय्यम पिके नोंदविण्याच्या सुविधेऐवजी तीन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर दुय्यम पिकांचा लागवडीचा दिनांक, हंगाम व क्षेत्र नोंदविण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुय्यम पिकांची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.