राज्य मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात मोठी घट झाली म्हणून आयत्यावेळी अकरावीची प्रवेश प्रक्रिया बदलण्याचा घाट घातला जात आहे. जर निकालात फारसा फरक पडला नसता तर हा बदल केला असता का, असा प्रश्न उपस्थित करत अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे केवळ लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य़ धरण्याचे नवे सूत्र अन्यायकारक असल्याची भावना विद्यार्थी, पालकांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडू नयेत यासाठी सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्याबाबतचा मुद्दा मांडला. या दोन्ही मंडळाचे विद्यार्थी आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना एका पातळीवर आणण्यासाठी काही मुख्याध्यापक आणि पालकांच्या सूचनेनंतर तावडे यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, सीबीएसई आणि आयसीएसई यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या पाश्र्वभूमीवर आता सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी आहे.

सीबीएसई आणि आयसीएसईचा अभ्यासक्रम कठीण आहे. काही शाळा विद्यार्थ्यांना जास्त गुण देतही असतील, पण राज्य मंडळाच्या परीक्षेचा निकाल कमी लागला म्हणून अचानक प्रवेश प्रक्रियाच कशी काय बदलू शकते? गेल्या वर्षी हा मुद्दा का उपस्थित झाला नाही? राज्य सरकारची ही दुटप्पी भूमिका नाही का? असा मुद्दा काही पालकांनी उपस्थित केला. सीबीएसई, आयसीएसई या मंडळांच्या विद्यार्थ्यांनीही अभ्यास केला आहे, मेहनत केली आहे. मग अचानक अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर नियम बदलणे या विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. सीबीएसई, आयसीएसईच्या सर्वच विद्यार्थ्यांना ९० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळालेले नाहीत. अनेक विद्यार्थ्यांना ७० टक्क्य़ांहूनकमी गुण आहेत. त्यांचे केवळ लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य़ धरल्यास ते आणखी कमी होऊन प्रवेशाचा प्रश्न निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षीपर्यंत सीबीएसईच्या मूल्यमापनामध्ये ७० टक्के गुण अंतर्गत, तर ३० टक्के गुण बाह्य़ परीक्षेसाठी होते. तर राज्य मंडळासाठी ८० टक्के गुण लेखी परीक्षेसाठी आणि २० टक्के गुण अंतर्गत होते. त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही. आता राज्य मंडळाच्या परीक्षेचा निकाल घटल्यावरच आक्षेप का, असाही प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेतील गुण ग्राह्य़ धरण्याचा राज्य सरकारचा विचार योग्य नाही. या पूर्वी सीबीएसईची काठिण्य पातळी जास्त असताना कोणतीही सवलत दिली गेली नाही. त्यावेळी न्यायालयात काही पालक गेले असता न्यायालयाने सर्व मंडळांना समान न्याय असल्याचे सांगितले होते. त्या दृष्टीनेच आताही बघितले पाहिजे. सीबीएसईच्या सगळ्याच शाळांनी अंतर्गत गुण जास्त दिले आहेत असे नाही.

– डॉ. मिलिंद नाईक, मुख्याध्यापक, ज्ञानप्रबोधिनी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New formula for eleventh admission
First published on: 13-06-2019 at 00:53 IST