नववर्षच्या स्वागतासाठी सोसायटीमधील शंभर टक्के सभासदांनी पार्टीसाठी पोलिसांकडे परवानगी मागितली तर दारुविना पार्टीसाठी परवानगी दिली जाईल, असे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सांगितले. विनापरवाना पार्टी करणाऱ्या सोसायटय़ांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नववर्ष स्वागताला शहरातील अनेक मोठ-मोठय़ा सोसायटय़ांमध्ये पाटर्य़ाचे आयोजन केले जाते. त्यासाठी डीजे, मद्याची सोय केलेली असते. उशिरापर्यंत नववर्षांचा जल्लोष सुरु असतो. याबाबत पोलीस आयुक्तांना पत्रकारांनी विचारले असता पोळ म्हणाले की, सोसायटय़ांमध्ये पार्टीला परवानगी दिली जाणार नाही. मात्र, सोसायटीच्या शंभर टक्के सदस्यांनी मागणी केली तर मद्याविना पार्टी करण्यास परवानगी दिली जाईल. आतापर्यंत सोसायटीसाठी कोणीही परवानगी मागितलेली नाही. नववर्षांचा बंदोबस्त मंगळवारी सायंकाळपासून शहरात लावण्यात येणार आहे. महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून प्रत्येक झोननुसार महिला पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचबरोबर गुन्हे शाखेची काही पथके आणि स्थानिक पोलीस ठाण्याचा बंदोबस्त तैनात राहणार आहे. दारु पिऊन वाहने चालविणारे, वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. चौका-चौकात वाहनांची तपासणी केली जाणार असून नववर्षांच्या स्वागतासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे.
लोणावळा, ऐतिहासिक स्थळांवर लक्ष
पुणे ग्रामीणमध्ये हॉटेल, रेस्टॉरंटला दीड वाजेपर्यंत परवानगी राहणार आहे. मात्र, लाऊडस्पीकर हे बारा वाजता बंद करावे लागतील. ग्रामीण पोलिसांकडून ऐतिहासिक स्थळे, किल्ले या ठिकाणांबरोबरच लोणावळा आणि पौड या ठिकाणी विशेष लक्ष दिले जाणार आहे. भीमाशंकर, आणि किल्ल्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी केली जाणार आहे. दारु पिऊन वाहने चालविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनी नियम पाळून नववर्षांच्या स्वागताचा आनंद लुटावा. नियम आणि वेळ पाळल्यास पोलीसही त्यांच्या आनंदात सहभागी असतील, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मनोज लोहिया यांनी दिली.
शहर व जिल्ह्य़ात १२५ कार्यक्रमांना परवानगी
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नववर्षांच्या स्वागतावरील कार्यक्रमाच्या करमणूक कर आकारणी संदर्भात तीस पथकांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत शहर आणि जिल्हा परिसरातून नववर्ष स्वागताच्या १२५ कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहर विभागातील पाटर्यावर वीस टक्के, तर ग्रामीण भागात दहा टक्के करमणूक कर आकारला जातो. ही पथके कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी किती लोक होते, त्या प्रमाणात कर भरला की नाही याची पाहणी करतील, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी दिली.