नोटाबंदी, जीएसटी, रेरामुळे निधीची संक्रांत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोटाबंदीनंतर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि रेरा या कायद्यांचा फटका सार्वजनिक गणेशोत्सवाला बसला असून, अनेक गणेशोत्सव मंडळांकडे निधीच जमलेला नाही. त्यामुळे सकल कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या उत्सवामध्ये आर्थिक मंदीचे सावट आहे. त्याची परिणती म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांना कात्री लागली असून, कलाकारांना ऐन गणेशोत्सवामध्ये काम नाही, अशी परिस्थिती उद्भवली आहे. ज्या मंडळांनी कार्यक्रम ठरविले होते त्यातील काही पावसामुळे रद्द करावे लागले.

गणपती हा सकल कलांचा देव. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये सुगीचे दिवस येतील ही कलाकारांना अपेक्षा होती. गणेशोत्सवामध्ये नाटक, लावणी, महाराष्ट्राची लोकधारा, ऑर्केस्ट्रा, एकपात्री कार्यक्रम, जादूचे प्रयोग आणि शाहिरीचे कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांना मागणी असते. मात्र, गेल्या नोव्हेंबरपासून लागू झालेल्या नोटाबंदीनंतर बाजारातील आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. त्यानंतर जीएसटीचा फटका सांस्कृतिक क्षेत्राला मोठय़ा प्रमाणावर बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नाटकांच्या प्रयोग संख्येमध्ये घट झाली आहे. नाटकासह सर्वच कलांना हलाखीचे दिवस आले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील गणेशोत्सव मंडळे दरवर्षी सादर करीत असलेल्या देखाव्यांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. मात्र, रेरा कायदा लागू झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. गणेश मंडळे निधीसाठी अवलंबून असतात, अशा बांधकाम व्यावसायिकांकडून अर्थसाहय़ नसल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांत बहुतांश मंडळांना निधीची चणचण जाणवत आहे, असे सध्याच्या गणेशोत्सवाचे चित्र दिसून येत आहे.

एकीकडे शहरामध्ये नोटाबंदी, जीएसटी आणि रेरा यामुळे गणेशोत्सवामध्ये निधी कमी झाला असून, सांस्कृतिक कार्यक्रमांना कात्री लागली आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ामध्ये दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या हे प्रश्न गंभीर आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजकांची ज्यांच्यावर मदार असते त्या सहकारी साखर कारखाने आणि सूतगिरण्या यांचीही आर्थिक परिस्थिती डबघाईचीच आहे. त्यामुळे परगावामध्ये तरी सांस्कृतिक कार्यक्रमांना मागणी असेल ही अपेक्षा फोल ठरली आहे, अशी माहिती संवाद संस्थेचे सुनील महाजन यांनी दिली.

नोटाबंदीनंतर जीएसटी आणि रेरा याचा फटका सांस्कृतिक क्षेत्राला बसला आहेच, पण गणेशोत्सवामध्ये जे काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतके कार्यक्रम ठरले होते त्यावर यंदा गणेशोत्सवामध्ये सलग पाच दिवस झालेल्या जोरदार पावसाने पाणी पडले, असे मनोरंजन संस्थेचे मोहन कुलकर्णी यांनी सांगितले. नगर येथील ‘श्री बाई समर्थ’ नाटकाचा प्रयोग, हडपसर येथील मंडळाने ठरविलेला निरंजन भाकरे यांचा भारुडाचा कार्यक्रम आणि विश्रांतवाडी येथील मंडळाने निश्चित केलेला ऑर्केस्ट्रा हे कार्यक्रम मुसळधार पावसामुळे रद्द करावे लागले. मात्र, बंदिस्त सभागृहामध्ये असलेले कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडले, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

एकपात्री कलाकारांकडे कार्यक्रम

एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रमांना फटका बसला असला, तरी एकपात्री कलाकारांना तुलनेने गणपती पावला असे चित्र आहे. एकपात्री कलाकारांना प्रामुख्याने सोसायटी गणेशोत्सवामध्ये कार्यक्रमांसाठी मागणी असते. बहुतांश सोसायटय़ांमध्ये सांस्कृतिक सभागृह आणि स्वत:ची ध्वनिव्यवस्था आहे. त्यामुळे सोसायटीचा गणेशोत्सव साजरा करताना करमणूक म्हणून एकपात्री कार्यक्रमांना पसंती दिली जाते. एका कलाकाराचे मानधन दिले की प्रश्न संपतो आणि ते बजेटमध्येही बसते, याकडे सुनील महाजन यांनी लक्ष वेधले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No cultural program due to gst and rera at pune
First published on: 02-09-2017 at 00:20 IST