राज्यात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या परीक्षेसाठी यावर्षी अजूनही जाहिरातच प्रसिद्ध न झाल्यामुळे या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मात्र, शासनाकडून परीक्षा आणि जागांबाबत अजूनही काही सूचना न आल्यामुळे परीक्षा घेऊ शकत नसल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे म्हणणे आहे.
राज्यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घेण्यात येते. आयोगाने जाहीर केलेल्या अंदाजित वेळापत्रकानुसार सप्टेंबरमध्ये पूर्वपरीक्षा आणि डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही या पदाच्या परीक्षेची जाहिरातही निघालेली नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. दरवर्षी एकदा या पदासाठी परीक्षा घेण्याचा संकेत आहे. शासनाने पदे मंजूर करून परीक्षा घेण्याबाबत आयोगाला अजून सूचना दिलेली नाही. त्यामुळे आता २०१३ मध्ये ही परीक्षा होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
गेल्यावर्षी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या जवळपास २०० पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. पात्र उमेदवारांच्या अभावी प्रत्यक्षात त्यापैकी ४५ पदांवर भरती करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या परीक्षेनंतर रिक्त राहिलेली पदे आणि नव्याने वाढू शकणारी पदे असे गृहीत धरून या परीक्षेसाठी साधारण २५० पदे असतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात एकीकडे मोठय़ा प्रमाणावर न्यायदंडाधिकाऱ्यांची गरज असल्याचे शासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात परीक्षा घेण्याबाबत शासनाने सूचना न दिल्यामुळे या वर्षांत परीक्षा झालेली नाही.
याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी सांगितले,‘‘प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदासाठी उच्च न्यायालयाकडून शासनाला सूचना मिळते आणि शासनाकडून आयोगाला. शासनाने सूचना दिल्याशिवाय आम्ही परीक्षा घेऊ शकत नाही. मात्र, विद्यार्थ्यांना पुढील वर्षांतील परीक्षांचा अंदाज यावा यासाठी वेळापत्रक टाकले जाते. त्यामध्ये बदल घडू शकतो.’’