महाविद्यालयात चार चाकी गाडी घेऊन जाता? मग या पुढे तुम्हाला वाहनतळाची सुविधा महाविद्यालयात मिळणार नाही. महाविद्यालयात जे विद्यार्थी चारचाकी वाहन घेऊन येत असतील, त्यांना महाविद्यालयाच्या आवारात वाहनतळाची सुविधा देण्यात येऊ नये, अशी सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केली आहे.
शहरातील महाविद्यालयांमध्ये वाहनतळासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काला विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता. त्या पाश्र्वभूमीवर महाविद्यालयांमधील वाहनतळाच्या प्रश्नाबाबत नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेमध्ये संमत झाला. या अहवालानुसार विद्यापीठाने महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. महाविद्यालयांत विद्यार्थी आणि अभ्यागतांच्या चारचाकी वाहनांना जागाच देण्यात येऊ नये, असे विद्यापीठाने म्हटले आहे.
महाविद्यालयाच्या आवारात सायकल, अपंग विद्यार्थ्यांची वाहने आणि कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहने यांना वाहनतळाची सुविधा मोफत द्यावी. वाहनतळांची स्वच्छता, सुरक्षा याची काळजी घेण्यात यावी. वाहनतळाच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरा लावण्यात यावेत. विद्यार्थ्यांच्या दुचाकी वाहनांसाठी दिवसाला ३ रुपये, मासिक पास ५० रुपये, सहामाही पास ३०० रुपये आणि वार्षिक पास ५०० रुपये अशी दर आकारणीही विद्यापीठाने दिली आहे. अभ्यागतांच्या दुचाकींसाठी १० रुपये दर आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाहनतळाच्या शुल्क आकारणीचा तक्ता दिसेल अशा ठिकाणी लावावा, असेही विद्यापीठाने म्हटले आहे.