डेंग्यूच्या संशयित रुग्णांच्या संख्येत चालू महिन्यात पुन्हा वाढ झालेली दिसत असताना पालिकेच्या आरोग्य विभागाकडील कीटकनाशकांच्या साठय़ात मात्र खडखडाट आहे. डासांच्या वाढीस अटकाव करण्यासाठी आवश्यक असणारी कीटकनाशके गेल्या महिन्याभरापासून पूर्णत: संपली असून ‘या डासांचे करायचे तरी काय,’ असा प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे.    
अधूनमधून ढगाळ हवामान तर दुपारच्या वेळी चक्क कडक ऊन, त्यातच पावसाने लावलेली हजेरी यामुळे डासांच्या वाढीसाठी शहरात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाकडील आकडेवारी पाहता डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मे महिन्यापासून पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे. जानेवारीपासून आतापरयत शहरात डेंग्यूचे ५८ संशयित रुग्ण आढळले होते. यात जानेवारीत आढळलेल्या रुग्णांची संख्या २७ होती. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये कडक उन्हाळ्यामुळे डेंग्यूचा फारसा प्रादुर्भाव दिसला नाही. त्यानंतर मे महिन्यात पुन्हा डेंग्यूचे १४ संशयित रुग्ण सापडले आहेत.   
डासांची पैदास होऊ नये यासाठी पालिकेकडून तीन प्रकारची कीटकनाशके वापरली जातात. यात ‘अॅबेट’ नावाच्या द्रवरूप कीटकनाशकाचा साठलेल्या पाण्यात फवारण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. हे कीटकनाशक महिन्याभरापासून संपले आहे. तसेच ‘बीटीआय लिक्विड’ हे कीटकनाशक आणि घरात फवारण्यासाठीची ‘सायफ्लुथ्रिन’ पावडर या दोन्ही औषधांचाही साठा संपला आहे. याबाबत आरोग्य प्रमुख एस. टी. परदेशी यांना विचारणा केली असता, कीटकनाशके खरेदी करण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू असून स्थायी समितीत त्याबाबत ठराव होण्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत, असे ते म्हणाले.
सध्या पालिकेकडे केवळ धूर फवारणीसाठीचे कीटकनाशक अल्प प्रमाणात शिल्लक आहे. जिथे माणसे स्वत: जाऊन फवारणी करू शकत नाहीत तिथे दूरवरून फेकून टाकण्यासाठीच्या कीटकनाशकाच्या गोळ्याही (ग्रॅन्यूल्स) शिल्लक आहेत. पण या ग्रॅन्यूल्सचा वापर प्रामुख्याने देवाची उरूळी भागात केला जात असून त्यांचा शहरातील कीटकनियंत्रणासाठी काहीच उपयोग होत नाही.