‘मागील पिढीतल्या अभिनेत्यांची एकमेकांशी ‘अभिनेते’ म्हणूनच ओळख होत असे. चित्रपटातली नवी पिढी मात्र अभिनेते म्हणून नावारुपाला येण्याआधीपासूनच एकमेकांना ओळखते. आम्ही एकमेकांना सहकलाकार मानण्याऐवजी मित्र मानतो. त्यामुळेच परस्पर स्पर्धेचे दडपणही कमी होते,’ अशा शब्दांत नवअभिनेत्री परिणिती चोप्रा आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी नव्या पिढीच्या भावना व्यक्त केल्या. ‘हंसी तो फंसी’ या चित्रपटासाठी परिणिती आणि सिद्धार्थ पुण्यात आले होते. या वेळी पत्रकार परिषदेत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
‘हंसी तो फंसी’ मधील आपली भूमिका आणि ‘लुक्स’बद्दल परिणिती आणि सिद्धार्थ भरभरून बोलले. या चित्रपटात परिणिती विचित्र वागणाऱ्या शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहे, तर सिद्धार्थने जीवनात यशस्वी नसलेल्या, गोंधळलेल्या मुलाची भूमिका निभावली आहे.
परिणिती म्हणाली, ‘‘या चित्रपटाचे ‘प्रोमोज’ बनवणे खूप आव्हानात्मक होते. चित्रपटाच्या गोष्टीतील नेमके वळण, पाहणाऱ्यांच्या आधीच लक्षात येऊ नये याची काळजी आम्हाला घ्यावी लागली. हा एक ‘टिपिकल रॉमकॉम’ चित्रपट असला तरी आमच्या भूमिका एकमेकांशी खूपच विसंगत असल्यामुळे तो नक्कीच वेगळा चित्रपट ठरेल.’’
परिणितीने ८ किलो वजन घटवले?
..ती तर निव्वळ अफवा!
परिणितीने या चित्रपटासाठी खूप कमी कालावधीत ८ किलो वजन घटवल्याची जोरदार चर्चा होती. याविषयी विचारले असता तिने, ही निव्वळ अफवा असल्याचे सांगितले. ती म्हणाली, ‘‘माझे वजन आधीही जास्त होते आणि आताही जास्त आहे. मात्र मी अधिक चांगले आणि ‘फिट’ दिसावे असे मला नक्कीच वाटते. ‘झीरो फिगर’ गाठणे मला कधी शक्य होईल असे मला वाटत नसल्यामुळे मी त्याचा कधी विचारही करत नाही.’’