पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी राज्याच्या सर्वच भागांतून भाजपचे कार्यकर्ते बस व मोटारी भरभरून मुंबईत पोहोचत असताना या सर्वानीच रविवारी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गासह महामार्गावरूनही टोलमुक्त प्रवास केला. पक्षाचा झेंडा लावलेल्या शेकडो बस व त्याच तुलनेत मोटारी टोल न भरताच पुढे निघून जाताना टोलनाक्यावर त्यांना कुणी हटकलेही नाही. मोदी स्वत: हातात झाडू घेऊन ‘स्वच्छ भारत अभियाना’चा नारा देत असताना कार्यकर्त्यांनी मात्र त्याला हरताळ फासत टोल नाक्यांच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण करीत ‘अस्वच्छता अभियान’च राबविले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी मोदी रविवारी मुंबईत आले होते. त्या निमित्ताने होणाऱ्या सभेसाठी रविवारी सकाळपासूनच राज्यभरातून मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्ते मुंबईकडे दाखल होत होते. त्यातील अनेक जण पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग व महामार्गाने मुंबईत दाखल झाले. भाजपचा झेंडा लावलेली जवळपास सर्वच वाहने कोणत्याही प्रकारचा टोल न भरताच पुढे जात होती. विशेष म्हणजे कोणत्याही टोल नाक्यावर टोल न भरल्याबाबत त्यांना हटकले जात नव्हते. त्यामुळे मोदींच्या कार्यक्रमासाठी अप्रत्यक्षपणे टोलमुक्तीच देण्यात आली असल्याचे दिसून येत होते.
शेकडो बस व त्याहून अधिक मोटारींतून कार्यकर्त्यांनी टोल न भरताच प्रवास केला. याबाबत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, कार्यक्रमाला जाणाऱ्या गाडय़ा टोल न भरताच पुढे जात असल्याचे त्यांनी मान्य केले. ही टोलमुक्ती कशासाठी होती, या प्रश्नावर मात्र कर्मचारी व अधिकाऱ्यांनीही मौन बाळगले.
मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांश कार्यकर्त्यांनी उर्से येथील टोलनाक्याजवळ वाहने थांबवून नाष्टा केला. मात्र, त्या वेळी पंतप्रधानांनी दिलेल्या संदेशाचा त्यांना विसर पडला. संपूर्ण देशात पंतप्रधानांच्या आवाहनानुसार स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असताना टोल नाक्यांच्या परिसरात प्रचंड कचरा करून कार्यकर्त्यांनी या अभियानाला हरताळ फासला. टोल नाक्याच्या परिसरामध्ये रिकामे फूड पॅकेट, पेपर प्लेट, केळीच्या साली, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या सर्वत्र विखुरलेल्या होत्या. हा कचरा जागेवरच टाकून कार्यकर्ते पुढे रवाना झाले. त्यानंतर टोल नाक्यांवरील कर्मचाऱ्यांना हा कचरा साफ करावा लागला. नेहमी चकाचक दिसणाऱ्या द्रुतगती मार्गावरील हा कचरा पाहून इतर प्रवाशांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
संग्रहित लेख, दिनांक 12th Oct 2015 रोजी प्रकाशित
मोदींसाठी शेकडो वाहनांना टोलमुक्ती
स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असताना टोल नाक्यांच्या परिसरात प्रचंड कचरा करून भाजप कार्यकर्त्यांनी या अभियानाला हरताळ फासला.
Written by दिवाकर भावे

First published on: 12-10-2015 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No toll for bjp activist