महानगर पालिका त्रिशंकूच पाहिजे हे लक्षात घ्या, ४०- ४५ जागा जिंकलो की १०० टक्के महापौर आपलाच. आपण फार मोठं स्वप्न बघत नाही की, शंभर येतील दीडशे येतील, तसे येणार नाहीत. हे आपल्याला माहिती आहे. महापौर आमच्याशिवाय होणार नाही…जसं आम्ही म्हणालो, मुख्यमंत्री आमचाच….झाला की नाही…झालाच, पहिल्या दिवसापासून कोणाला माहीतीय ५५ – ५४ चा मुख्यमंत्री होईल. असे दोन चार पत्ते इथं हातात घ्या असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत सत्ता कशी आणायची याचे धडे दिले.

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते संबोधित करत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारने, माजी खासदार आढळराव पाटील, राहुल कलाटे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राऊत यांनी एकमेकांचा द्वेष करू नका असे आवाहनही कार्यकर्त्याना केले.

यावेळी, संजय राऊत म्हणाले की, माझ्या अख्ख्या आयुष्यात मंत्रालयात तीन वेळेस गेलो. मी मंत्रालयात जात नाही, काही नसतं मंत्रालयात. महानगर पालिका, जिल्हा परिषदा ही आपली ताकद आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या ४०- ४५ जागा जिंकलो की शंभर टक्के महापौर आपलाच. महानगर पालिका त्रिशंकूच पाहिजे हे लक्षात घ्या. आपण फार मोठं स्वप्न बघत नाहीत. की, शंभर येतील दीडशे जागा येतील. तसे येणार नाहीत हे आपल्याला माहिती आहे. पण, महापौर आमच्याशिवाय होणार नाही..जस आम्ही म्हणालो, मुख्यमंत्री आमचाच….झाला की नाही…झालाच, पहिल्या दिवसापासून कोणाला माहीतीय ५५- ५४ चा मुख्यमंत्री होईल. असे दोन-चार पत्ते इथं (पिंपरी-चिंचवड) मध्ये हातात घ्या. ३०- ४० जागा निवडून आणून महापौर करता येईल. अन्यथा दुसरा पर्याय आहे. असे म्हणत त्यांनी सत्ता कशी आणायची हे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना लक्षात आणून दिले.

संजय राऊत म्हणाले की, संघटना मजबूत करा, कार्यकर्त्यांना ताकद द्या, एकत्र राहा. एकमेकांचा द्वेष करू नका. एकाच पक्षाचे आपण आहोत. एका झेंड्या खाली काम करतोय. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपली श्रद्धा आहे. आपला देव कोण आहे? बाळासाहेब ठाकरे…! ३५ वर्षे त्यांच्यासोबत काम केलं आहे. मला माहित आहे त्यांच्याकडे काय शक्ती होती. अजूनही त्यांचा पक्षाला आशीर्वाद आहे. आपण कुठे एकमेकांशी भांडत बसलो आहोत. यावेळी महानगर पालिका आणायची या जिद्दीने उतरा असे ठणकाहून त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

पिंपरी-चिंचवडला शिवसेनेचा महापौर पाहिजे

“चिंचवड भागात पाच किंवा सहा नगरसेवक असण ही चांगलं लक्षण नाही. लाज वाटली पाहिजी आपल्याला, अनेक वर्षे यासंदर्भात आपण विचार करतोय. १४ होते त्याचे नऊ झाले. नऊ चे ९० होतील हे मला माहित नाही. ५० तरी व्हायला पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी पिंपरी-चिंचवडच्या पदाधिकारी आणि खासदारांकडे केली. पिंपरी-चिंचवडला शिवसेनेचा महापौर पाहिजे हे स्वप्न आपण पाहिलं पाहिजे. कोणीही ऐरागैरा महापौर होतोय,” अस देखील राऊत म्हणाले आहेत.