कादंबरीकार विश्वास पाटील यांची अपेक्षा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातील प्रकाशात न आलेल्या जागांचा शोध घेणे आवश्यक आहे. सुभाषबाबूंच्या जीवनावर खूप लिहिले गेले असले तरी अद्यापही विस्तृत लेखन व्हावे, अशी अपेक्षा कादंबरीकार विश्वास पाटील यांनी रविवारी व्यक्त केली.

आझाद हिंद सेनेच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, आशय आणि आम्ही पुणेकर यांच्यातर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात पाटील बोलत होते. ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ऑफबिट डेस्टिनेशनचे नितीन शास्त्री, आशयचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, अ‍ॅड. मिलिंद पवार या वेळी उपस्थित होते. पाटील यांच्या ‘महानायक’ या कादंबरीच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.

पाटील म्हणाले, सुभाषबाबूंचे जीवन काळाने दाबण्याचा प्रयत्न केला. त्यांचे कार्य दडपण्यात आले. त्यामुळे त्यांच्या जीवनातील अनेक बाबींवर अभ्यास करून प्रकाश टाकायला हवा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुभाषबाबू हयात असते तर ते पंतप्रधान झाले असते. दुर्दैवाने त्यांचे कार्य आपण नीट समजून घेतले नाही. मी अनेक वर्षे अभ्यास करून, देश-परदेशात जाऊन त्यांच्यावर अभ्यास केला आणि त्यानंतरच कादंबरी लिहिण्याचे धाडस केले. वास्तविक हा धगधगता इतिहास शोधणे कठीण काम होते. नव्या लेखक, संशोधकांनी हे आव्हान स्वीकारावे. नव्या पिढीचे काही लेखक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करत आहेत, याचा आनंद आहे.

महाजन म्हणाले, इतिहासाच्या अभ्यासक्रमात भारतातील शूरवीरांना महत्त्व दिले जात नाही, त्यामुळे इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. ‘एखाद्या विषयावर संशोधन करून त्यावर लेखन करणे ही बाब दुर्मिळ झाली आहे’, अशी खंत प्रा. जोशी यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन सुप्रिया चित्राव यांनी केले.