ताशी १०० किलोमीटर; स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम प्रगतिपथावर

भुंडी लोकल ते सध्याची बारा डब्यांची पुणे-लोणावळा लोकल येत्या काही दिवसांत आणखी वेगवान होणार आहे. गाडय़ांचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचप्रमाणे सध्या जुन्या का होईना, पण वेगाने धावू शकणाऱ्या सिमेन्स ईएमयू लोकल रेल्वेच्या ताफ्यात दाखल होत आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा लोकल येत्या काही दिवसांत ताशी १०० किलोमीटर वेगाने धावू शकणार आहे.

पुणे-लोणावळादरम्यान प्रवाशांना सेवा देण्यासाठी सध्या चार लोकल आहेत. या लोकल दिवसभरात ४४ फेऱ्या करतात. त्याचा लाभ दररोज एक लाखांहून अधिक प्रवासी घेतात. प्रवाशांची वाढती संख्या व त्यामुळे डब्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता नऊ डब्यांची लोकल काही वर्षांपूर्वी बारा डब्यांची करण्याची करण्यात आली. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जादा लोकल पुण्यासाठी द्याव्यात आणि उपलब्ध लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवासी अनेक दिवसांपासून करत आहेत.

पुणे-लोणावळा मार्गावर लोकल किंवा त्यांच्या फेऱ्या वाढवण्यासाठी गाडय़ांचा वेग वाढवणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने या रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वीजवाहिन्या दोन वर्षांपूर्वी डायरेक्ट करंटऐवजी (डीसी) आता अल्टरनेट करंटवर परावर्तित करण्यात आल्या आहेत. सध्या पुणे-लोणावळा मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम वेगाने सुरू आहे. पुढील चार ते पाच महिन्यांत हे काम पूर्ण होऊ शकणार आहे. दुसरीकडे सध्याच्या लोकल बदलून सिमेन्सच्या लोकल ताफ्यात आणण्यात येत आहेत. मुंबईत वापरलेल्या या लोकल असल्याने त्याबाबत प्रवासी संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या लोकल ताशी शंभर किलोमीटर वेगाने धावू शकतात, असा रेल्वेचा दावा आहे. स्वयंचलित सिग्नल यंत्रणा आणि सिमेन्स लोकल यामुळे लोकल ताशी १०० किलोमीटर वेगाने धावू शकतील.

पुणे-लोणावळा मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम कामशेत स्थानकापर्यंत पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसांत तळेगावपर्यंत ते पूर्ण होईल. त्यानंतर मार्च किंवा एप्रिलपर्यंत संपूर्ण मार्गावरील काम पूर्ण होईल. त्यामुळे लोकल ताशी १०० किलोमीटर वेगाने धावू शकेल.

– मिलिंद देऊस्कर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक