वाहनांचा शिकाऊ परवाना देण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून गुजरात पॅटर्न पुण्यात राबविण्यात येणार आहे. शिकाऊ परवाना ऑनलाईन देण्यासाठी ‘स्क्रिीन टेस्ट अॅन्ड लर्निंग लायसन्स’ (स्टाल) ही पद्धत एका महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांचा त्रास कमी होऊन एकाच दिवशी जास्त लोकांना शिकाऊ परवाना मिळणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अरूण येवला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी सहायक परिवहन अधिकारी अजित शिंदे उपस्थित होते. येवला यांनी सांगितले की, प्रादेशकि परिवहन कार्यालयात शिकाऊ परवान्याची परीक्षा दोन हॉलमध्ये घेण्यात येते. साधारण दिवसाला चारशे शिकाऊ परव्ांाने दिले जातात. मात्र, स्टाल पद्धत सुरू केल्यानंतर संगणकांची संख्या वाढवली जाणार आहे. नागरिकांना शिकाऊ परवान्याची परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन अगोदर ऑनलाईन नोंदणी करून कोणत्या वेळी परीक्षा द्यायची हे निवडता येईल. नोंदणी अर्जाबरोबर फोटो व इतर कागदपत्रांच्या छायांकित प्रती संकेतस्थळावर नागरिकांनी देणे आवश्यक आहे. या सुविधेमुळे नागरिकांना रांगेत उभे राहावे लागणार नाही. स्टाल परीक्षा ही सध्या चार भाषांमध्ये देता येणार आहे. प्रत्येक संगणकावर वेगवेगळे प्रश्न असतील. त्यामुळे कॉपी करता येणार नाही. बारामती येथे अगोदर पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला आहे.
चॉईस नंबरला प्रतिसाद कमी
चॉईस क्रमांकाच्या शुल्कामध्ये राज्य शासनाने १५ मे पासून तिप्पट वाढ केली. पूर्वी दहा हजार ते एक लाखांपर्यंत मिळणाऱ्या चॉईस क्रमांकासाठी आता पन्नास हजार ते बारा लाखांपर्यंत रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे चॉईस क्रमांकाला कमी प्रतिसाद मिळाला आहे.
स्कॅ्रप रिक्षावर कारवाई
रिक्षा स्क्रॅप केल्याचे दाखवून नंतर रस्त्यावर रिक्षा आणणाऱ्यांवर कारावाईची मोहीम उघडण्यात येणार आहे. ही रिक्षा रस्त्यावर आढळून आल्यास ती सरकार जमा करून त्या रिक्षा चालकाचे परमीट रद्द केले जाईल. त्याच्याकडून २५ हजार रूपये दंड वसूल करून त्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे अरुण येवला यांनी सांगितले.
वाहनांच्या नोंदणीत ४० टक्के घट
शहरातील वाहनांमध्ये वाढ होत असल्याचे बोलले जात असताना, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दैनंदिन नोंदणीत चाळीस टक्क्य़ांनी घट झाली आहे. यामागे दुष्काळ आणि मंदी ही कारणे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी व चारचाकी वाहनांची दैनंदिन नोंदणी होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यामध्ये तब्बल चाळीस टक्क्य़ांनी घट झाली आहे.