पुणे हे विद्येचं माहेरघर तसंच सांस्कृतिक वसा जपणारं शहर म्हणून ओळखलं जातं. याच शहरातील बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात कलाकार मंडळी आपली चित्रं किंवा फोटोंचं प्रदर्शन आयोजित करत असतात. अशाच प्रकारे पुण्यातील फोटोग्राफर अक्षय माळी या तरुणाने येथे न्यूड फोटोचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. पण काहींनी विरोध दर्शवल्याने त्याला हे प्रदर्शन बंद करावं लागलं. यामुळे अक्षयने नाराजी व्यक्त केली असून अशा प्रकारचे प्रदर्शन भविष्यातदेखील आयोजित करणार असल्याचं सांगितलं आहे.
लोकसत्ताने या प्रदर्शनाबाबत अक्षय माळीसोबत संवाद साधला असता तो म्हणाला की, “मी ७ जानेवारीला बालगंधर्व कलादालनात न्यूड फोटोंचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. पण त्याच दरम्यान एक व्यक्ती आला आणि माझ्याकडे फोन दिला आणि तुमच्याशी एकाला बोलायाचं आहे सांगितलं. त्यावर मी फोन घेताच समोरील व्यक्ती म्हणाला की हे प्रदर्शन दोन मिनिटात बंद कर, अन्यथा आम्ही बंद करू. असे म्हणताच मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर व्यवस्थापनाने प्रदर्शन कोणालाही पाहू दिले नाही. या घडामोडीनंतर मी प्रदर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला”.
अक्षय माळीने प्रदर्शन बंद करावं लागल्याने नाराजी जाहीर केली आहे. “या सर्व प्रकारानंतर समाजातील काही लोकांची मानसिकता समोर आली आहे. पण असो, यापुढेदेखील शहरातील काही प्रदर्शनाच्या गॅलरी आहेत तिथे अशा प्रकारचे प्रदर्शन निश्चित भरवणार असल्याचे त्याने सांगितलं.