‘‘गेल्या पाच वर्षांत रुग्णालयात होणाऱ्या प्रसूतींमध्ये ४० टक्क्य़ांवरून ८० टक्क्य़ांपर्यंत वाढ झाली आहे. असे असूनही देशात एक लाखामागे १३९ माता मृत्यू होतात. गरोदर महिलांपैकी १७ टक्के महिलांना लठ्ठपणा व मधुमेहाचा त्रास असल्याचे दिसून येते. त्यामुळे बाळालाही हे आजार होण्याची शक्यता वाढते,’’ असे प्रतिपादन ‘फीगो’ (इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ गायनॅकोलॉजी अँड ऑब्स्टेट्रिक्स) या संघटनेचे अध्यक्ष डॉ. सी. एन. पुरंदरे यांनी केले.
‘फीगो’सह ‘फॉग्सी’ (फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया) यांच्यातर्फे आयोजित केलेल्या स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञांच्या परिषदेचे शुक्रवारी पुण्यात उद्घाटन करण्यात आले. या वेळी डॉ. पुरंदरे बोलत होते. ‘फॉग्सी’च्या अध्यक्ष डॉ. अलका क्रिपलानी, माजी अध्यक्ष डॉ. हेमा दिवाकर, ‘पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकोलॉजिकल सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. चारुचंद्र जोशी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भारती ढोरे-पाटील या वेळी उपस्थित होते.
प्रसूतिवेदना, ‘सी-सेक्शन’ प्रसूती, पोषक आहार, अॅनिमिया (पंडुरोग), लठ्ठपणा, मधुमेह अशा अनेक समस्यांकडे दुर्लक्ष होत असून त्यावर जागतिक आरोग्य संघटना आणि ‘फिगो’ने काही चांगले उपाय सुचवले आहेत, असेही डॉ. पुरंदरे यांनी सांगितले.
डॉ.क्रिपलानी म्हणाल्या ,‘‘गरोदरपणात स्त्रीची चांगल्या प्रकारे काळजी घेणे, प्रसूती रुग्णालयात करणे आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीत वेळीच वैद्यकीय मदत मिळणे यामुळे माता मृत्यू व अर्भक मृत्यू लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. ’’