सिंहगड किल्ल्यावरील साफसफाईमध्ये झुंजार बुरुजाजवळील तटबंदीनजीक जुनी पायवाट सापडली आहे. दगडी गस्ती मार्ग आणि पाणी जाण्याचा मार्ग या पायवाटेमुळे उजेडात आला आहे.
महाराष्ट्र राज्य गड संवर्धन समितीतर्फे किल्ले सिंहगड येथील स्वच्छता अभियानामध्ये वनसंवर्धन समितीने झुंजार माचीजवळील तट बुरुजांची स्वच्छता केली. तटबंदीजवळ जाणारा मार्ग हा मातीच्या भरावाने आणि झाडीझुडपांमुळे बंद झाला होता. तटबंदीवर असलेली झाडे तोडल्यामुळे हा मार्ग खुला झाला. दगडी फरसबंद मार्गाच्याखाली गडावरील पाणी वाहून जाण्याचा सुमारे पाच फूट लांब आणि पाच फूट खोल असा मार्गदेखील सापडला आहे. या नव्याने सापडलेल्या मार्गाजवळ उत्खनन आणि तट बुरुजाची दुरुस्ती करण्याची मागणी समितीचे सदस्य चंद्रशेखर शेळके यांनी पुरातत्त्व विभागाकडे केली आहे.
समितीच्या कार्यकर्त्यांनी पहाटे पाच वाजल्यापासून स्वच्छता अभियानास सुरूवात केली. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, दारुच्या बाटल्यांनी पोती खचाखच भरली. आमदार भीमराव तापकीर यांनी सिंहगडाला भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली. पुरातत्त्व विभागाचे पुणे विभागाचे सहायक संचालक विलास वाहाणे या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old walking trails found at sinhagad
First published on: 04-05-2016 at 03:25 IST