सगळीकडे भारलेला उत्साह, वरातीचे घोडे, बँडबाजा, सनई-चौघडा, तुतारी, रुखवत अशा वातावरणात मंगलाष्टका झाल्या. कृतज्ञतेच्या मंडपामध्ये वधू-वरांवर आनंदाच्या अक्षता पडल्या आणि मातृदिनाचे औचित्य साधून अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांनी तीन लेकींचे कन्यादान केले.
सासवडजवळील कुंभारवळण गावचा परिसर लगीनघाईने गजबजला होता. ममता बाल सदन या आश्रमाची जन्मापासूनच सावली लाभलेल्या सुनीता, दीपाली आणि उषा या तिघीजणी रविवारी विवाहबद्ध झाल्या. रुसवे-फुगवे, मानपान असे काहीही नसलेल्या या मंडपामध्ये केवळ कृतज्ञतेचाच वास होता. समाजाने नाकारलेल्या या तिघींना सिंधूताई सपकाळ यांनी केवळ मातृत्वाची छाया दिली नाही, तर शिकवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. या तिघींचा विवाह होत असताना आपल्या मुली ‘दिल्या घरी सुखी होणार’ याचा आनंद एका डोळय़ात, तर आता मुली आपल्यापासून दूर जाणार याची व्याकूळता अशीच सिंधूताईंची भावना होती.
संस्थेतील २८२ मुलींची यापूर्वी लग्ने झाली. त्यामध्ये या तिघींची भर पडली असल्याचे मनोगत सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले. दोन हजार वऱ्हाडी मंडळींनी जिलेबी, पुलाव अशा सुग्रास भोजनाचा लाभ घेत वधू-वरांना आशीर्वाद दिले.