कोथरूड येथे गुरुवारी रात्री कुख्यात गुंड गजा मारणे व नीलेश घायवळ या टोळ्यांच्या सदस्यांमध्ये मारामारी झाली. यामध्ये घायवळ टोळीचा एकजण जखमी झाला आहे. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे.
अंत्या ऊर्फ अनंत ज्ञानोबा कदम (वय ३०, रा. गुजराथ कॉलनी, कोथरूड) याला अटक करण्यात आली आहे, तर बापू श्रीमंत बागल, गणेश हुंडारे (रा. शास्त्रीनगर) आणि शेखर आडकर यांचा शोध सुरू आहे. या मारामारीत रमेश दत्तात्रय राऊत (वय ३०) हा जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारणे टोळीतील चौघेजण एका आरोपीला मारण्यासाठी कोथरूड येथे आले होते. मात्र, हवी असलेली व्यक्ती त्यांना सापडली नाही. त्याच वेळी राऊत हा दिसल्याने आरोपींनी त्याच्यावर कोयता व इतर शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये राऊतच्या डोक्यात, पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.