खडकी येथील एका व्यावसायिकाचे पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यावरील ८० लाख परस्पर गुजरात आणि जम्मू-काश्मीर राज्यात हस्तांतर करणाऱ्या टोळीने यापूर्वी नोयडा आणि मुलूड येथील बँकेतून कोटय़वधी रुपये हस्तांतर केल्याचे उघडकीस आले आहे. पैसे हस्तांतर करण्यासाठी खातेदाराला पाच टक्क्य़ांपर्यंतचे आमिष दाखवून त्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतर केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणात सायबर शाखेने आणखी एका आरोपीला अटक केली असून पूर्वी अटक केलेल्या पाच जणांस २४ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
चंद्रकांत जगनाथ कांबळे (वय ४६, रा. भांडुप) असे नवीन अटक केलेल्याचे नाव आहे. तर पूर्वी अटक केलेले फजलऊर रेहमान अब्दुलअमीन खान (वय २७, रा. उत्तर प्रदेश), शाहरूख अब्दुलअमीन खान (वय २७, ), इमरान गफारभाई कालवा (वय ३३, रा. दोघेही – भावनगर, उत्तर प्रदेश ), दिनेश वालाजी कुंधाडीया (वय ५४, रा. वसई, ठाणे) आणि राजेंद्रसिंह रूपसिंह जडेजा (वय ४८, रा. भावनगर, गुजरात) यांच्या कोठडीत वाढ केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  या गुन्ह्य़ाचे मुख्य सूत्रधार फजलऊर आणि चिकण्या आहेत. अटक पाच जणांकडे केलेल्या चौकशीत २०१३ मध्ये यांनी मुलूड येथील एका खात्यातून लाखो रुपये हस्तांतर केले आहेत. त्याच बरोबर २००८ मध्ये नोयडा येथील बँकेच्या एका खात्यातून सुद्धा एक कोटी ६६ लाख हस्तांतर केले आहेत. या आरोपींकडून जप्त केलेल्या डाटावरून आरोपी हे १२ ईमेल आयडीचा वापर करत होते. पैसे हस्तांतर करताना ते बनावट नावाचा वापर करत. ज्या खात्यावर पैसे हस्तांतर केले आहेत. त्या खातेदाराला खात्यावर जमा झालेल्या पैशासाठी पाच टक्क्यांपर्यंत कमिशन दिले जात होते, असे ही तपासात समोर आले आहे.
 पूना अॅटो अॅन्सीलीरीज या कंपनीचे खडकी येथील पंजाब नॅशनल बँकेत खाते आहे. या खात्यातून २५ ऑगस्ट २०११ रोजी अचानक ८० लाख गुजरात आणि जम्मू येथील बँकेत हस्तांतर झाले होते. या गुन्ह्य़ाचा तपास गुन्हे शाखेच्या सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक बाबर यांनी या आरोपींना अटक केली.