शहरातील बँकिंग क्षेत्रात सायबर भामटय़ांकडून फसवणुकीच्या घटना वाढीस लागल्याचे चित्र आहे. बँक मॅनेजर बोलत आहे, तुमच्या खात्याची माहिती त्वरित द्या, अन्यथा खाते बंद करण्यात येईल, अशी बतावणी करून भामटे संबंधिताच्या खात्यातून पैसे काढून घेतात. सायबर भामटय़ांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून सामान्यांपर्यंत सर्वानाच असा गंडा घातला आहे. या पाश्र्वभूमीवर खासगी बँकांनी ग्राहकांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
शहरातील अनेकांना सायबर भामटय़ांकडून गंडवले जात आहे. संबंधिताला काही ना काही बतावणी करून त्याच्या एटीएमचा पिन क्रमांक विचारला जातो आणि तो मिळवून एटीएममधून परस्पर पैसे काढले जातात. तसेच काही घटनांमध्ये एटीएम कार्डवरील माहिती चोरून (क्लोनिंग) खात्यातील लाखो रुपये सायबर भामटय़ांनी लांबविले आहेत. फसवणुकीच्या या घटना लक्षात घेऊन ग्राहकांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एचडीएफसी बँकेने पावले उचलली आहेत. बँक खातेदाराचे मोबाईल लोकेशन आणि पैसे काढण्यात येणाऱ्या एटीएमचे ठिकाण वेगळे असेल तर खातेदाराला त्याची माहिती तातडीने देण्याची सुविधा बँकेकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा सर्व ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (एनसीपीआय) सहकार्य घेतले जाणार आहे.
सुरक्षाविषयक उपाययोजनांची माहिती एचडीएफसी बँकेचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी समीर राटोलीकर यांनी बुधवारी दिली.   सायबर गुन्ह्य़ांमध्ये ज्या पद्धतीने फसवणूक केली जाते त्यांचा अभ्यास करता फिशिंग, स्मिशिंग, ट्रोजन, स्किमिंग असे प्रकार असल्याचे दिसून आले आहे. सायबरतज्ज्ञांनी या गुन्ह्य़ांची पद्धती पाहून या चार प्रकारांची वर्गवारी केली आहे. भामटे परस्पर बँक खातेदारांचे पैसे स्वत:च्या खात्यात वळवतात. अशा गुन्ह्य़ांना आळा घालण्यासाठी ग्राहकांमध्ये जागृती करून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या खात्यावरून एखादी रक्कम संशयितरीत्या हस्तांतरित होत असल्यास ती प्रक्रिया त्वरित बंद करून त्याची माहिती खातेदाराला देण्यात येणार आहे, असे राटोलीकर यांनी सांगितले.
नॅशनल पेमेंट कॉपरेरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने लवकरच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकाचे लोकेशन आणि एटीएमचे लोकेशन विसंगत आढळल्यास त्याचीही माहिती ग्राहकाला त्वरित दिली जाईल. आणि ग्राहकाच्या सूचनेनंतरच पुढील व्यवहाराची प्रक्रिया पार पडेल. अन्यथा तो व्यवहार बंद करण्याची प्रक्रिया बँक करेल.