पर्यावरण जागृतीसाठी आंबेगावातील पोखरकर कुटुंबीयांकडून नवा पायंडा
दशक्रिया विधीच्या निमित्ताने होणारी भाषणे व अन्य पारंपरिक गोष्टी टाळून उपस्थित पै पाहुणे व ग्रामस्थांना आंब्याची व पेरूची रोपे वाटण्याचा कौतुकास्पद उपक्रम आंबेगावातील पोखरकर परिवाराने राबवला आहे. जवळपास एक हजार रोपे वाटून त्यांचे व्यवस्थित संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी आप्तेष्टांना केले. जुन्नरच्या म्हेत्रे परिवाराने लग्नात रोपे वाटल्याची व त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केल्याची घटना ताजी असतानाच शेजारच्या आंबेगावातही पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवणाऱ्या पोखरकर परिवाराचे कौतुक होत आहे.
आंबेगावातील खडकी पिंपळेगाव येथील ह.भ.प. बजाबा गेणूजी पोखरकर (वय – १०६ वर्षे) यांचे १३ मे २०१७ रोजी निधन झाले. नुकताच त्यांचा दशक्रिया विधी झाला. यानिमित्ताने पंचक्रोशीतील पै-पाहुणे, आप्तेष्ट व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या वेळी पोखरकर व त्यांचे निकटवर्तीय बांगर परिवाराने नेहमीच्या प्रथा-परंपरा बाजूला ठेवल्या. दशक्रियेचा धार्मिक विधी उरकल्यानंतर भाषणबाजीला फाटा देऊन उपस्थितांना आंब्याची व पेरूची जवळपास एक हजार रोपे वाटण्यात आली. काकस्पर्श होण्याचीही वाट पाहिली नाही. पोखरकर व बांगर परिवाराच्या या निर्णयाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
जुन्नरच्या म्हेत्रे परिवाराने लग्नासाठी आलेले पै-पाहुणे आणि वऱ्हाडी मंडळींना हार-तुरे आणि मानपान करण्याऐवजी पेरूची रोपे वाटून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
गेल्या वर्षी मुलीच्या लग्नात केशरी आंब्याची पाच हजार रोपे वाटली होती व त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ मध्ये कौतुकही केले होते. पर्यावरणविषयक जनजागृतीची परंपरा कायम ठेवत या परिवाराने कुटुंबातील दुसऱ्या विवाह सोहळ्यातही चार हजार पेरूच्या रोपांचे वाटप केले होते. त्यापाठोपाठ, शेजारच्या आंबेगाव तालुक्यातही पर्यावरण जागृतीचा हेतू ठेवून पोखरकर परिवाराने दशक्रिया विधीच्या दिवशी रोपांचे वाटप केले.
पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून दशक्रिया विधीच्या दिवशी एक हजार रोपांचे वाटप केले. पर्यावरणाचा समतोल बिघडतो आहे, त्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे, त्यादृष्टीने टाकलेले हे पाऊल आहे. इतरांनीही पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावेत.
– दादाभाऊ पोखरकर, मुलगा
भाषणे, देणग्यांचे वाटप अशा गोष्टी दशक्रिया विधीला सर्रास होतात. मात्र, पोखरकर परिवाराचा रोपांचे वाटप करण्याचा हा वेगळा उपक्रम कौतुकास्पद आहे.
– देवदत्त निकम, सामाजिक कार्यकर्ते