गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली असून हिरवी मिरची, काकडीच्या भावात दहा ते वीस टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यातबंदी उठवल्याने आवक कमी झाली आहे. कांद्याचे भाव किलोमागे पाच रुपयांनी वाढले आहेत. अन्य फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात रविवारी (४ फेब्रुवारी) राज्य, तसेच परराज्यातून मिळून एकशे सत्तर ते एकशे ऐंशी ट्रक एवढी फळभाज्यांची आवक झाली. मध्यप्रदेशातून दहा ते बारा ट्रक मटार, बंगळुरुतून सहाशे पोती आले, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून सहा ट्रक लसूण, दिल्लीहून दहा ट्रक गाजर, कर्नाटकातून तीन ते चार ट्रक कोबी, कर्नाटकातून पाच ट्रक तोतापुरी कैरी अशी आवक परराज्यातून झाली. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली. हिरवी मिरची, काकडीच्या भावात दहा ते वीस टक्क य़ांनी वाढ झाली. निर्यातबंदी उठविल्यानंतर बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. प्रतिकिलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे,अशी माहिती घाऊक बाजारातील व्यापारी निखील भुजबळ यांनी दिली.
सातारी आले बाराशे पोती, टोमॅटो साडेपाच ते सहा हजार पेटी, हिरवी मिरची तीन ते चार टेम्पो, ढोबळी मिरची तीन ते चार टेम्पो, शेवगा तीन ते चार ट्रक, भुईमुग शेंग दोनशे ते अडीचशे पोती, मटार तीस ते चाळीस पोती, पावटा पाच ते सहा ट्रक, कांदा पावणेदोनशे ट्रक, आग्रा, इंदुर, गुजरात आणि तळेगाव येथून मिळून बटाटा सत्तर ट्रक अशी आवक झाली.
कोथिंबीर, मुळा, हरभरा गड्डी स्वस्त
गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक वाढली असून भाव स्थिर आहेत. तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीच्या दोन लाख जुडी आणि मेथीच्या एक लाख जुडींची आवक झाली. चाकवत, करडई, हरभरा गड्डी, मुळा या पालेभाज्यांच्या भावात पाच ते दहा टक्कयांनी घट झाली आहे. पालेभाज्यांचे शेकडय़ाचे भाव पुढीलप्रमाणे-कोथिंबीर-२०० ते ६००, मेथी-२०० ते ५००, शेपू-२०० ते ५००, कांदापात-५०० ते ८००, चाकवत-५०० ते ६००, करडई-४०० ते ५००, पुदिना-२०० ते ३००, अंबाडी-४०० ते ५००, मुळा-५०० ते ८००, राजगिरा-४०० ते ५००, चुका-५०० ते ८००, चवळई-४०० ते ५००, पालक-४०० ते ५००, हरभरा गड्डी-५०० ते ६००
डाळिंब, पेरू महाग; बोरे स्वस्त
थंडी कमी झाल्याने फळबाजारात कलिंगडांची आवक वाढली आहे. कलिंगडांची प्रतवारी चांगली नसल्याने अपेक्षित मागणी नाही. डाळिंबाची आवक वाढली आहे.डाळिंबाला मागणी चांगली आहे. चांगल्या प्रतीच्या डाळिंबाना मागणी आहे. बोरांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. बोरांचे भाव कमी झाले आहेत. रायपूर येथून पेरुची आवक सुरु झाली आहे. बाजारात दोन हजार किलो रायपूर पेरुची आवक झाली. लिंबासह अन्य फळांचे भाव स्थिर आहेत. रविवारी फळबाजारात अननस सहा ट्रक, जुनी मोसंबी सोळा टन, नवीन मोसंबी तीस टन, संत्री पंधरा टन, डाळिंब पंचवीस ते तीस टन, पपई पंधरा ते वीस टेम्पो, चिक्कू दहा टन, लिंबे सात ते आठ हजार गोणी, चिक्कू दहा टन, द्राक्षे दहा ते बारा टन, रामफळ तीन टन, खरबूज चार टन, गावरान अंजिर एक टन, स्ट्रॉबेरी सहा टन, बोरे दीडशे पोती अशी आवक फळबाजारात झाली.