उपाहारगृहे सुरू झाल्याने वाढलेली मागणी आणि अतिवृष्टीने खरिपाच्या कांद्याचे झालेले नुकसान यामुळे राज्यात सर्वच ठिकाणी सोमवारी कांद्याने डोळ्यांत पाणी आणले. मुंबई महानगरात कांद्याच्या किरकोळ दराने ७०-९० रुपयांवर झेप घेतली, तर पुणे परिसरात तो ५० ते ७० रुपयांच्या घरात पोहोचला.
परतीच्या पावसाचा फटका कांद्याला बसल्याने नव्या कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. परिणामी, बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याचे भाव वाढत आहेत. ही दरवाढ आणखी महिनाभर राहील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत दोन दिवसांपूर्वी ४५ ते ५० रुपयांवर असलेला कांद्याचा घाऊक दर सोमवारी ६५ ते ७० रुपयांवर पोहोचला. त्यामुळे किरकोळ बाजारातील कांदाचा दर ७० ते ९० रुपये झाला.
पुण्यात किरकोळ बाजारात जुना कांदा प्रतवारीनुसार ५० ते ७० रुपये किलोवर गेला असून डिसेंबपर्यंत कांद्याचे दर तेजीत राहतील, असे जाणकारांनी सांगितले. सोमवारी वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ७० गाडी कांदा आला. आवक घटल्याने दर दर वाढले.
इराणचा २५ टन कांदा दाखल
एपीएमसी बाजारात मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा होत असल्याने दर नियंत्रणात ठेवण्यासाठी इराणवरून कांद्याची मागणी करण्यात आली आहे. सोमवारी मुंबई बंदरात ६०० टन इराणी कांदा दाखल झाला आहे. यातील २५ टन कांदा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणार आहे.
पुण्यात चांगल्या प्रतीच्या दहा किलो जुन्या कांद्याला घाऊक बाजारात ५५० ते ६२० रुपये असा दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात एका किलो कांद्याची विक्री प्रतवारीनुसार ५० ते ७० रुपये दराने केली जात आहे. आवक सुरळीत होईपर्यंत पुढील दोन महिने कांद्याचे दर तेजीत राहणार आहेत, अशी माहिती कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.
लासलगावातही मोठी भाववाढ
नाशिक : लासलगावमध्ये पाच दिवसांपूर्वी कांद्याचा क्विंटलचा दर सरासरी ४३०० रुपये होता. सोमवारी कांद्याला क्विंटलमागे किमान १२०० ते कमाल ७०८२, तर सरासरी ६४०० रुपये भाव मिळाला. उपाहारगृहे, रेस्टॉरंट सुरू झाल्याने कांद्याची मागणी वाढणे हे दरवाढीचे प्रमुख कारण असल्याचे ‘नाफेड’चे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी सांगितले.
जुन्या कांद्याला मागणी
दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला मागणी वाढली आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात नवीन कांद्याचा हंगाम सुरू होतो. यंदा नवीन कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. डिसेंबपर्यंत नवीन कांद्याची आवक सुरू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत जुन्या कांद्याचे दर तेजीत राहणार आहे, असे पुण्यातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.
नवी मुंबई
कांदा दर (घाऊक)
इराणचा कांदा : ५० ते ६०
नवीन कांदा : ५० ते ६०
जुना कांदा : ६० ते ७०
ऑक्टोबर महिन्यातील कांद्याचे दर
वर्ष किलोचे दर
२०१७ १५ ते २० रुपये
२०१८ ३० ते ४० रुपये
२०१९ ४० ते ५० रुपये
२०२० ५० ते ७० रुपये
