धर्मादाय आयुक्तालयाच्या आवाहनाला केराची टोपली; ४५ अर्ज ऑनलाइन, १० ऑफलाइन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवात वर्गणी गोळा करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची ऑनलाइन वा ऑफलाइन पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, शहरातील ४५०० मंडळांपैकी केवळ ५५ गणेश मंडळे आणि संस्थांचे लेखी अर्ज आले आहेत. त्यामुळे उर्वरित गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा आदेश धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट झाले आहे. धर्मादाय कार्यालयातून सोमवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार आलेल्या अर्जापैकी ४५ अर्ज ऑनलाइन, तर १० ऑफलाइन पद्धतीने आले आहेत.

शहर आणि जिल्हय़ात मिळून सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक नोंदणीकृत मंडळे आणि विश्वस्त संस्था आहेत. त्यापैकी शहरातील मंडळांची पोलिसांकडील संख्या यंदा ४ हजार ४९९ आहे. या सर्व मंडळांना आणि विश्वस्त संस्थांना चालू वर्षांपासून उत्सवासाठी देणग्या, वर्गणी गोळा करण्यासाठी लेखी पूर्वपरवानगी घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, मंडळे आणि विश्वस्त संस्थांकडून त्याची दखल घेण्यात आली नसल्याचे  स्पष्ट झाले आहे.

चालू वर्षांपासून सर्व गणेश मंडळांना वर्गणी, देणग्या स्वीकारण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तालयाकडे लेखी किंवा ऑनलाइन अर्जाद्वारे पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केल्याने त्याबाबतची प्रक्रिया गणेशोत्सवापूर्वी राबवण्यात आली होती. तसेच राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन पारदर्शकता आणण्याचे आवाहन केले होते. परंतु, आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र समोर आले आहे. लेखी पूर्वपरवानगी घेणे ही औपचारिकता आहे, परंतु तरीही नोंदणीकृत मंडळे, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी धर्मादाय कायद्याला धुडकावत मांडव, त्याची परवानगी, देणगी, वर्गणीच्या परवानगीबाबतही कायद्याचे पालन न करण्याचेच धोरण स्वीकारल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. परवानगी न घेणाऱ्या मंडळांवर काय कारवाई होणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

७० टक्के मंडळांना परवानगीच नाही

सार्वजनिक गणेश मंडळांना मंडपासाठी परवानगी घेण्यासाठी सुलभ प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र शहरातील सत्तर टक्के मंडळांनी मंडपासाठी परवानगीच घेतली नव्हती. शहरातील ४ हजार ४९९ सार्वजनिक गणेश मंडळांपैकी केवळ १ हजार १०७ मंडळांनी मंडप उभारणीसाठी महापालिकेकडे रीतसर परवानगी घेतली आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या नियम, कायद्यांना हरताळ फासण्याचे काम यंदाही सुरूच आहे.

धर्मादाय कायद्यामध्ये नव्याने झालेल्या सुधारणेनुसार यंदाच्या वर्षांपासून दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि अन्य सणांसाठी देणग्या, वर्गणी घेण्यापूर्वी लेखी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. नोंदणीकृत संस्थांनी कायमस्वरूपी परवानगी घेतली आहे. परंतु, तात्पुरत्या स्वरूपातील परवानगीसाठी केवळ ५५ अर्ज आले आहेत. सर्वच नोंदणीकृत मंडळांना कायमस्वरूपी परवानगी देण्याची तरतूद आहे.

नवनाथ जगताप, सहायक धर्मादाय आयुक्त

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only 55 ganesh mandals take permission to accept ganesh festival donations
First published on: 29-08-2017 at 02:11 IST