जोमात असलेल्या प्रायोगिक रंगभूमीच्या विविध विषयांवरील नाटकांच्या सादरीकरणासाठी साने गुरुजी स्मारक येथे नव्या रंगमंचाची उभारणी करण्यात आली आहे. लोकरंजनातून लोकशिक्षणाची परंपरा कलापथकाच्या माध्यमातून जोपासणाऱ्या राष्ट्र सेवादलाने पुढाकार घेऊन साकारलेल्या या रंगमंचाचे उद्घाटन मंगळवारी (२ एप्रिल) प्रसिद्ध अभिनेते आणि नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेतर्फे अहल्यादेवी प्रशालेजवळ सुदर्शन रंगमंच आणि हिराबागेजवळील ज्योत्स्ना भोळे रंगमंच हे प्रायोगिक नाटकांसाठीचे दोन रंगमंच सध्या कार्यरत आहेत. त्यामध्ये आता बॅ. नाथ पै रंगमंचाच्या माध्यमातून तिसऱ्या छोटेखानी नाटय़गृहाची भर पडणार आहे. या रंगमंचाच्या उद्घाटनानिमित्ताने प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकारांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष अरिवद कपोले, कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य, सिंधू काटे आणि प्रा. राजीव जोशी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
या रंगमंचाचे व्यवस्थापन पाहणारे दीपक रेगे म्हणाले, साने गुरुजी स्मारक येथील रावसाहेब पटवर्धन शाळेच्या सभागृहाचे छोटेखानी नाटय़गृहामध्ये रूपांतर करण्यात आले आहे. सभागृहाची रंगरंगोटी, फॉल्स सीिलग ही कामे पूर्ण झाली आहेत. सभागृहामागे असलेल्या खोलीचे मेकअप रूममध्ये रूपांतर करण्यात आले असून, तेथून कलाकारांना रंगमंचावर प्रवेश करणे शक्य होणार आहे. खुर्चीमध्ये १००, तर भारतीय बैठकीमध्ये ७५ असे किमान १७५ प्रेक्षक रंगमंचावरील नाटकाचा आनंद लुटू शकतील. यासाठी केवळ पाच लाख रुपये खर्च आला आहे. शाळेच्या सभागृहाला असलेले बॅ. नाथ पै यांचेच नाव या रंगमंचाला देण्यात आले आहे. या औपचारिक कार्यक्रमानंतर ११ ते १८ एप्रिल या कालावधीत प्रायोगिक नाटय़महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.