उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर शिक्षणाची दारे मोठय़ा प्रमाणावर खुली केली. मोठय़ा शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. गुंतवणूक व गुणवत्ताही आली, पण या सर्व प्रक्रियेत समाजाचा एक भाग शिक्षणापासून वंचित राहिला व काही मुठभर लोकांकरीताच हे शिक्षण झाले. त्यातून विषमतेचे बीजारोपण झाले. त्यामुळे सर्वसामान्यांना शिक्षण देणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
खडकी शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षांचा प्रारंभ फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला, त्या वेळी ते बोलत होते. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार विजय काळे, माधुरी मिसाळ, लक्ष्मण जगताप, मेधा कुलकर्णी, शरद रणपिसे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार, संस्थेचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, चिटणीस चंद्रकांत छाजेड आदी त्या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले,की शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाबरोबरच गुणवत्तेवर आधारित शिक्षण गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवत्ता वाढविण्याची मोठी जबाबदारी शिक्षक व विद्यार्थ्यांवर आहे. कारण सरकार नव्हे, तर शिक्षकच शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल घडवू शकतात. देशाची पिढी घडविण्याचे पवित्र काम शिक्षकांकडे आहे, ते त्यांनी योग्य प्रकारे केले पाहिजे. पुढील काळामध्ये निर्माण होणाऱ्या रोजगारांचा विचार करता शिक्षणामध्ये कौशल्यावर भर द्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक कौशल्य कसे देता येतील, याकडे लक्ष द्यावे लागेल. देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे चांगले नागरिक विद्यार्थ्यांमधून निर्माण व्हावेत. खडकी शिक्षण संस्था सुरू करण्याचा उद्देश महान आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी संस्था करीत असलेले काम मोलाचे आहे.
गिरीश बापट यांनीही संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. पुणे हे शिक्षणाचे हब होत असताना त्यात खडकीचाही वाटा आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी, तर आभार प्रदर्शन विलास पंगुडवाले यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2015 रोजी प्रकाशित
उदारीकरणानंतरच्या प्रक्रियेत समाजाचा एक भाग शिक्षणापासून वंचित- मुख्यमंत्री
खडकी शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षांचा प्रारंभ फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला, त्या वेळी ते म्हणाले , की सर्वसामान्यांना शिक्षण देणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही शासनाची जबाबदारी आहे.
First published on: 14-02-2015 at 03:18 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opening of khadki education society by devendra phadanvis