शहरातील नाटय़गृहांमध्ये भर पाडणाऱ्या पं. नेहरु सांस्कृतिक केंद्राचा पडदा रविवारी (२१ डिसेंबर) उघडणार आहे. पण, येथील मर्यादित आसनक्षमतेमुळे या नाटय़गृहात व्यावसायिक नाटकाचा प्रयोग होणे अवघड आहे.
अनेक वर्षे रखडलेले घोले रस्त्यावरील नाटय़गृह सप्टेंबरमध्ये पूर्ण झाले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या संकुलाचे उद्घाटन झाले. मोठा रंगमंच आणि संपूर्ण वातानुकूलित ही वैशिष्टय़े असलेल्या या नाटय़गृहाचे पं. जवाहरलाल नेहरु केंद्र असे नामकरण करण्यात आले असून कलादालनाला राजा रविवर्मा आर्ट गॅलरी असे नाव देण्यात आले आहे. हे नाटय़गृह २२५ आसनक्षमतेचे आहे. गेल्या दोन महिन्यांत येथे सुगम संगीताचे कार्यक्रम आणि ऑक्रेस्ट्रा असे कार्यक्रम झाले आहेत.
इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) पुणे निर्मित ‘मनातले सारे..’ या अनोख्या नाटय़विष्काराच्या माध्यमातून रविवारी (२१ डिसेंबर) रात्री साडेनऊ वाजता या नाटय़गृहाचा पडदा पहिल्यांदा उघडणार आहे. संजय डोळे लिखित काव्यनाटय़ाविष्काराच्या माध्यमातून उलडगणाऱ्या या प्रयोगाचे दिग्दर्शन अमृत सामक यांनी केले आहे. इप्टाच्या कलाकारांनी सादर केलेल्या या नाटकाला राज्य नाटय़ स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या वेळी हे नाटक अनेकांना पाहता आले नसल्याने त्याचा प्रयोग सादर होणार असल्याची माहिती अमृत सामक यांनी दिली.
प्रायोगिक रंगभूमीसाठी स्वतंत्र नाटय़गृह असावे या संकल्पनेतून हे नाटय़गृह साकारले गेले आहे. या नाटय़गृहाचे काम लवकर पूर्णत्वास जावे यासाठी रंगकर्मीनी आंदोलन केले होते. त्याचप्रमाणे नाटय़संमेलनाध्यक्ष अरुण काकडे यांनीही आग्रह धरला होता. आता रविवारी होणारा हा प्रयोग प्रायोगिक रंगभूमीवरचा असला तरी येथे असलेली मर्यादित आसनक्षमता ध्यानात घेता या नाटय़गृहामध्ये व्यावसायिक नाटकाचा प्रयोग होणे अवघड आहे. व्यावसायिक नाटक या नाटय़गृहामध्ये सादर करणे कोणत्याही नाटय़संस्थेला आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही.
हा रंगमंच चांगला असला तरी येथे एकावेळी केवळ सव्वादोनशे प्रेक्षक नाटकाचा आस्वाद घेऊ शकतात. त्यामुळे नामवंत कलाकार असलेल्या व्यावसायिक नाटकाला हे नाटय़गृह परवडणारे नाही. कलाकारांचे मानधन, नाटय़गृहाचे भाडे आणि जाहिरातीवर होणारा खर्च ध्यानात घेता नाटय़संस्थांचे गणित बसत नाही, याकडे ‘मनोरंजन’चे मोहन कुलकर्णी यांनी लक्ष वेधले. मात्र, सुगम संगीताचे कार्यक्रम, एकपात्री कलाकार यांच्यासाठी हे नाटय़गृह चांगले असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opening of nehru centre
First published on: 20-12-2014 at 03:05 IST