गायन, वादन, नृत्य, नाटय़ आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या पुणे फेस्टिव्हलचे शुक्रवारी (१८ सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर आणि प्रेम चोप्रा यांना ‘पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्कार’, तर संगीतकार अजय-अतुल, डॉ. उमा गणेश नटराजन आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांना ‘पुणे फेस्टिव्हल पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी साडेचार वाजता होणाऱ्या कार्यक्रमास महापौर दत्ता धनकवडे, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अभिनेत्री खासदार हेमा मालिनी, िबदू, पूनम धिल्लन, अभिनेता अनिल कपूर, म्हैसूरचे महाराज यदुवारी कृष्णदत्ता चामराजा वाडियार, उपमहापौर आबा बागूल उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि संयोजक कृष्णकांत कुदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन, हेमा मालिनी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला श्रीकृष्णवंदना हा नृत्याविष्कार, कलावर्धिनी संस्थेच्या विद्यार्थिनींचा नृत्यकार्यक्रम, महाराष्ट्र मंडळाच्या विद्यार्थ्यांची योग-मल्लखांब प्रात्यक्षिके, लावणी आणि भांगडा यांचे फ्यूजन, जय मल्हार आणि गोंधळ हा आध्यात्मिक महाराष्ट्राचे दर्शन घडविणारा नृत्याविष्कार हे कार्यक्रम प्रत्यक्ष उद्घाटनापूर्वी होणार आहेत. कलर्स मराठी वाहिनीच्या सहकार्याने ‘मानाचा मुजरा : अजय-अतुल’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हे कार्यक्रम होणार आहेत. नामवंत शायरांचा सहभाग असलेला उर्दू मुशायरा मंगळवारी (२२ सप्टेंबर) होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे गुरुवारी (२४ सप्टेंबर) मराठी कविसंमेलन होणार आहे.

व्हिंटेज कार प्रदर्शन
‘पुणे फेस्टिव्हल’अंतर्गत कोंढव्यातील बेव्हरली हिल येथे १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत व्हिंटेज कार प्रदर्शन खुले राहणार आहे. यामध्ये १९३४ मधील ऑस्टीन, १९५० ची मॉरिस, १९५१ ची फियाट-११००, डॉज किंग्ज, इंदिरा गांधी यांनी वापरलेली शेव्हरलेट इम्पाला, १९६० पासूनची गेल्या ५० वर्षांतील मर्सिडीज बेंझची विविध मॉडेल्स, २०११ मधील लंडन टॅक्सी, लॅम्ब्रेटा स्कूटर, राजदूत बॉबी या गाडय़ा प्रदर्शनात पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.