scorecardresearch

खळबळजनक : कामावरुन काढल्याच्या रागातून दुकानातील कामगाराने मालकिणीला पेटवले

कामगारासह मालकिणीचा होरपळून मृत्यू ; पुण्यातील वडगाव शेरी येथील घटना

(प्रातिनिधिक छायाचित्र)

कामावरुन कमी केल्याच्या रागातून टेलरिंग दुकानातील कामगाराने मालकिणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वडगाव शेरी भागात घडली. या घटनेत मालकिणीसह तिला पेटवून देणाऱ्या कामगाराचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत एक जण जखमी झाला आहे.

कामगार मिलींद गोविंदराव नाथसागर (वय ३५) आणि दुकान मालकिण बाला नोया जोनिंग (वय ३२ रा. मांदळे निवास, रामचंद्र सभागृहाजवळ, वडगाव शेरी) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या घटनेत प्रशांतकुमार सुशांतकुमार देबनार जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. जोनिंग मूळच्या आसामच्या आहेत. त्यांचे वडगाव शेरीत ए टू झेड हे टेलरिंग दुकान आहे. जोनिंग या महिलांचे कपडे शिवत असत. तसेच दुकानासमोर त्या भाजीपाला विक्री करायच्या. चार महिन्यांपूर्वी मिलिंद नाथसागर त्यांच्या दुकानात कामाला आला. मात्र, तो व्यवस्थित काम करत नसल्याने आठवड्यापूर्वी जोनिंग यांनी त्याला कामावरुन कमी केले.

सोमवारी (२५ एप्रिल) रात्री साडेअकराच्या सुमारास नाथसागर जोनिंग यांच्या दुकानात गेला. कामावरुन कमी केल्याने त्याने त्यांच्याशी वाद घातला आणि त्याच्याकडील बाटलीत असलेले पेट्रोल त्याने जोनिंग यांच्या अंगावर ओतले. सिगारेटच्या लायटरचा वापर करुन त्याने जोनिंग यांना पेटवून दिले. त्या वेळी जोनिंग यांनी त्याला पकडून ठेवले. या घटनेत दोघेही गंभीर भाजले. नाथसागरबरोबर असलेला मित्र प्रशांतकुमार सुशांतकुमार देबनार दुकानाच्या बाहेर थांबला होता. त्याने दुकानाचा दरवाजा उघडला. तोपर्यंत दुकानातील कपड्यांनी पेट घेतल्याने आग भडकली होती. या घटनेत देबनारही जखमी झाला. दुकानात आग लागल्याची माहिती रहिवाशांना मिळाल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.

रहिवाशांनी तातडीने दुकानातून तिघांना बाहेर काढले. त्यांना रूग्णालयात दाखल केले. नाथसागरचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. जोनिंग यांचा मंगळवारी सकाळी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गायकवाड तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Out of anger at being fired the shop worker set the owner on fire pune print news msr

ताज्या बातम्या